मत्स्य व्यवसाय करायचाय.. ई- श्रम पोर्टलवर अशी करा नोंदणी

0

केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार विभागाच्या पोर्टलवर देशातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे देण्याच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर मासेमारी करणारे, मत्स्य विक्रेते व मत्स्यव्यवसाय संबंधित कामांमध्ये थेट सहभागी असलेल्या कामगारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. https://register.eshram.gov.in या पोर्टलवर जाऊन मत्स्य व्यवसायाशी संबंधीत मजुरांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक बँकेचे तपशील या माहितीसह मत्स्य कामगारांची या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त दि.शि. कुऱ्हाडे यांनी केले आहे.

            पोर्टलमध्ये नोंदणी झाल्यास मत्स्य व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत अपघाती मृत्यूनंतर दोन लाख व कायमचे अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मदत देणे शक्य होणार आहे. अचानक उद्भवणाऱ्या आणि राष्ट्रीय महामारीसारख्या परिस्थितीत मदत वितरीत करताना ही माहिती कामी येणार आहे. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी संबंधित व्यक्तींची वयोमर्यादा 16 ते 59 वर्षे आहे. या व्यक्ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सभासद नसाव्यात, कोणत्याही शासकीय वा निमशासकीय सेवेत नसावे, जिल्ह्यातील मत्स्य कास्तकार स्वतः या पोर्टलवर नोंदणी करु शकतात. किंवा जवळच्या आपले सेवा केंद्र येथे नोंदणी करु शकतात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सोलापूर कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कुऱ्हाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here