Vaccination | जिल्हा परिषदेत प्रवेशास लसीकरण प्रमाणपत्र गरजेचे

0

Mh13news Network

कोविडच्या Omicron व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात नव्याने निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी व आरोग्य अधिकारी यांना नव्या व्हेरिएन्टच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठक घेऊन शासकीय कार्यालयात कोविड लसीकरणाच्या प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. आज जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर जिल्हा परिषदेत येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना लसीकरणाच्या प्रमाणपत्र तपासून कार्यालयात सोडले जात होते. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांच्या लसीकरणाची सोय देखील करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांनी दिली. तसेच कोविड तपासणीची देखील सोय केली असल्याचे यावेळी डॉ शितलकुमार जाधव यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत नागरीकांनी आपल्या सोबत आपले लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे जेणेकरून कोणाची गैरसोय होणार नाही. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांनी लसीकरण करून घेवूनच कार्यालयात यावे. याकामी प्रशासनास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरील लसीकरण व कोविड तपासणी कक्षात कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक नरेंद्र गायकवाड व आरोग्य सेविका जाधव यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here