विजय चव्हाण कुर्डूवाडी.
“माझे दुकान,माझी मागणी”
कुर्डूवाडी शहरातील सर्व सलून दुकानदारांनी आपल्या मागण्यांसाठी आपल्या दुकानाबाहेर मागणी पत्रक, सलून साहित्य हातामध्ये घेऊन शासनाचे सर्व नियम पाळून अनोखे आंदोलन केले. सलून दुकाने सुरु करण्यास शासनाने परवानगी दयावी. नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये जमा करावेत. तसेच सलून व्यावसायिकांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे.
राज्यात जवळपास इतर सर्वच दुकाने चालू झाली आहेत. नाभिक बांधव सर्व प्रकारची खबरदारी आणि दक्षता घेत असूनही सलून बंदीचा आदेश काढण्यात येतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. मंगळवार दि. ९ जून रोजी, सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी-ज्योती कदम यांना नाभिक समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सलून दुकाने चालू करण्यास परवानगी न मिळाल्यास या पुढेही लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर गाडेकर यांनी दिला.
करोना लॉकडाऊनच्या काळात सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम सलून चालक, मालक, कारागिरांनी शासनास सहकार्य करून आपली दुकाने बंद ठेवली आहेत. उदरनिर्वाहसाठी पारंपारिक नाभिक व्यवसायाशिवाय इतर साधन नाही. ९०% लोकांकडे शेती नाही, दुकाने, राहती घरे भाडेपट्ट्याने घेतली आहेत. त्यामुळे भाडे, वीजबील, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर उधार उसनवारी आदी खर्च आहेत. त्यामुळे शासनाने समाजाला आर्थिक मदत देऊन नाभिक समाजाला या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी यावेळी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी रामभाऊ राऊत, बापु दळवी, पोपट गाडेकर, संजय महाराज गाडेकर, ईश्वर गाडेकर, नंदकिशोर वाघमारे, विजय गाडेकर, अजय काशीद, संतोष गाडेकर, राजु गोरे, आदित्य सुर्यवंशी, उमेश सुर्वेकर, संजय काशिद, सुधिर काशिद, तुळशीराम महाबोले, नागजी ताटे, बालाजी गाडेकर, ओंकार गाडेकर, अविनाश कोकाटे, गणेश भालेकर, विनोद गायकवाड, पांडुरंग राऊत, बंडु चौधरी यांच्यासह शहरातील अनेक नाभिक बांधवांंनी आपआपल्या दुकानासमोर हे आंदोलन केले.