आनंदी वार्ता :उजनीवर अवतरलं नवख्या लेसर फ्लेमिंगोंचे थवे.!

पक्षी वैभवात भर..

0

यंदा उजनी पाणलोट क्षेत्रात विविध प्रकारच्या विदेशी पक्ष्यांनी हजारोंच्या संख्येने लांबवरुन स्थलांतर करून हिवाळा सुरू होण्यापूर्वीच दाखल झाले होते. आता त्यांच्या परतीच्या प्रवासाला प्रारंभ होण्याच्या तयारीत असताना आफ्रिका खंडातून शेकडोंच्या संख्येने लेसर फ्लेमिंगो उजनी पाणलोट क्षेत्रावर येऊन दाखल झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली.

उजनीवर दरवर्षी न चुकता येणारे रोहित पक्षी हे ग्रेटर फ्लेमिंगो या प्रकारचे असतात. ते कच्छच्या रणातून येतात. मात्र पश्र्चिम आफ्रिकेत मूळ वास्तव्याला असलेले लेसर फ्लेमिंगो या प्रकारचे रोहित पक्षी प्रथमंच या वर्षी येथे आले आहेत. चार वर्षांपूर्वी केवळ दोन लेसर फ्लेमिंगोची उजनीवर नोंद झाल्याची माहितीही डॉ. कुंभार यांनी दिली. मात्र या वर्षी दीडशेच्या घरात हे नवीन परदेशी पाहुणे कुंभारगाव, कोडारचिंचोली, टाकळी या गावांच्या शिवारातील उजनी पाणपृष्ठावर ऐटीत विहार करताना आढळून आले आहेत.हे लेसर फ्लेमिंगो धरण निर्मितीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने येऊन इतिहास रचले आहेत.
उजनीसह जिल्ह्यातील इतर पाणवठ्यावर नेहमी येणा-या फ्लेमिंगोपेक्षा आकाराने लहान असलेले लेसर फ्लेमिंगो इतर गुणधर्मामध्येही भिन्न असतात. रंगाने हे पक्षी वरून गुलाबी मिश्रित सफेद तर पंखाचा खालचा आतील भाग गडद गुलाबी असतो.. त्यांची चोच लहान आकाराची असून ती आखुड व गर्द गुलाबी रंगाची असते. लेसर फ्लेमिंगोंना छोटा रोहित या नावांनेही ओळखतात.
लेसर फ्लेमिंगोंमधील खाद्य सवयी ग्रेटर फ्लेमिंगो सारखीच आहे. हे पक्षी देखील वनस्पतींची अंकुर, शेवाळे, जलकीटक, मृदुकायी प्राणी इत्यादी खाद्य मटकवतात..
लेसर फ्लेमिंगोंना सागर किनारा व नद्यांच्या संगमाच्या परिसरातील खाड्यांमधील ‘ब्रॅकिश वाॅटर’ वर विहार करायला आवडते. दर वर्षी हे थव्याच्या थवेने लिटल कच्छच्या रणातून जुलै – आॅगष्ट दरम्यान नवीन पिढीला जन्म घालून भारत भ्रंमतीला हिवाळी पाहुणे म्हणून निघतात व महाराष्ट्रातील मुंबई जवळच्या शिवडी व ठाणे परिसरातील खाड्यांमधे येऊन पुढील चार पाच महिन्यांच्या वास्तव्याला येतात.

ओरिसा मधील चिल्का या खाऱ्यापाणी मिश्रित सरोवरात, तामिळनाडू राज्यातील पाॅईंट कॅलीमेर खाडी तसेच राजस्थान मधील साल्ट लेक या ठिकाणी ही हे पक्षी हजारोंच्या संख्येने येऊन दाखल होतात. मात्र यंदा किनार पट्टी पार करून भूभागातील उजनी पर्यंत मजल मारून हे पक्षी बहुसंख्येने आल्याने पक्षी अभ्यासक चकित झाले आहेत.

ग्रेटर फ्लेमिंगोंच्या सहवासात लेसर फ्लेमिंगो मोठ्या संख्येने उजनीवर आल्यामुळे तेथील पक्षी वैभवात भर पडले असून पक्षी निरीक्षक सुखावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here