महागात पडले 300 रुपये ; बनावट पास बनवणारे दोघे ताब्यात

0

MH13 NEWS Network

पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवेसाठी पास देण्यात येत आहेत.त्या पास ची बनावट तयार करून विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रत्येकी तीनशे रुपये प्रमाणे हे पास विकत होते अशी माहिती मिळाली आहे.त्यांच्याकडील कलर प्रिंटर आणि काही बनावट पास ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी शहरात फिरता यावे म्हणून नगरपालिका प्रशासनाने ही सोय केली होती. कर्मचाऱ्यांच्या सोबतच काही विक्रेत्यांनाही अशा प्रकारचे पास नगरपालिकेकडून देण्यात आले आहेत.दरम्यान नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक चिदानंद सर्वगोड आणि अतिक्रमण विभागाचे दत्तात्रय होटकर यांना संशय आल्याने काही विक्रेत्यांच्या पासची तपासणी केली. तेव्हा त्यांना एक बनावट पास दिसून आला. त्यांनी सदर प्रकाराची माहिती पोलिसांना कळवली.

त्यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता महावीर नगरमधील सुरज मनोहर जाधव हा त्याच्या घरात बनावट पास बनवत होता तर त्याच परिसरात राहणारा उमेश छत्रे हा बनावट पासची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी सुरज जाधव आणि उमेश छत्रे याना ताब्यात घेतले. तसेच कलर प्रिंटर आणि काही बनावट पास जप्त केले. याप्रकरणी नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक चिदानंद सर्वगोड यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . त्यावरून या दोन्ही संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . या दोघांनी बनावट पास किती लोकांना विकले याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here