सोलापुरात एकाच दिवशी दोन कोरोना बाधित महिलांचा मृत्यू

0

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात आज एकाच दिवशी दोन कोरोना बाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. आज एका दिवसात सात जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 135 झाली आहे. एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाल्याने सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या आठ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

मोहोळ तालुक्यातील पाटकुल-पेनुर येथील 26 वर्षीय महिलेला 24 एप्रिल रोजी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 एप्रिल रोजी या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यान तीन मे रोजी रात्री अकरा वाजता या महिलेचे निधन झाले आहे. आज मृत पावलेली दुसरी महिला ही 65 वर्षांची असून ती सोलापुरातील न्यू पाच्छा पेठ परिसरातील आहे. तीन मे रोजी दुपारी बारा वाजता या महिलेला सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अवघ्या एक तासात या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची कोरोना चाचणी घेण्यात आली असून आज सकाळी या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

आज या भागात आढळले नवीन रुग्ण…

सोलापुरात आज नव्याने आढळलेल्या सात कोरोना बाधित रुग्णांमध्ये नइ  जिंदगी परिसरातील दोन महिला, शास्त्रीनगर परिसरातील एक महिला, न्यू पाच्छा पेठ परिसरातील एक महिला, सोलापूर जवळील देगाव येथील एक पुरुष, गेंट्याल चौका समोरील भगतसिंग मार्केट जवळील एक पुरुष व सोलापुरातील जोडभावी पेठेतील एका पुरूषाचा समावेश आहे.

सोलापुरात एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 135 झाली  असून आजपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 105 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. कोरोनावर मात करुन बरे  होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या बावीस असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

आज दिवसभरात 116 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 109 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. सात अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये दोन पुरुष पाच महिला व एका मृत  महिलेचा समावेश आहे. आज दिवसभरात कोरोना मुक्त होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या तीन आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here