मोहोळ: ‘मी आत्महत्या करणार आहे’ चिट्ठी लिहून तरुणीची आत्महत्या

0

MH13 NEWS NETWORK:

वकिलीचे शिक्षण घेतलेल्या गितांजली विलास पाटील (वय 28, रा. कुरुल, ता. मोहोळ) या तरुणीने प्रेम प्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोलापुरातील पत्रकार भवन चौकातील वॉटर फ्रंटच्या फ्लॅट नंबर 401 येथे घडली. शुक्रवारी रात्री पावणे एकच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात गितांजलीचा प्रियकर शिवरत्न दीपक गायकवाड आणि त्याची आत्या सीमा सुभाष पाटील (दोघे रा. मोहोळ, सोलापूर) या दोघांवर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

लग्नास दिला नकार..
शिवरत्न हा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांचा मुलगा आहे. तर आरोपी सीमा पाटील या मोहोळच्या नगरसेविका आहेत. गितांजलीचे वडील विलास मारुती पाटील (वय 58, रा. कुरुल, ता. मोहोळ) यांनी फिर्याद दिली आहे. गितांजलीचे एलएलबीचे शिक्षण पूर्ण झाले असून ती मैत्रिणीसोबत गेल्या एक महिन्यापासून वॉटर फ्रंटमधील रूमवर राहत होती. यातील आरोपी शिवरत्न याने गितांजली हिला गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून तुझ्यासोबत लग्न करतो असे बोलून विश्‍वास संपादन केला होता. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. शिवरत्न आणि त्याची आत्या सीमा पाटील या दोघांनी संगनमत करून गीतांजली हिला लग्नास नकार दिला. शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून गितांजलीने शुक्रवारी रात्री रूमवर छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
रात्री उशिरा गितांजलीच्या नातेवाइकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात आरोपी शिवरत्न आणि त्याची आत्या सीमा या दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके तपास करीत आहेत.

मी आत्महत्या करणार आहे..
घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत शिवरत्नसोबत असलेल्या प्रेमसंबंधांचा उल्लेख गितांजलीने केला आहे. शुक्रवारी दुपारपासूनच गितांजलीची मानसिक स्थिती ठीक नव्हती. आत्महत्येपूर्वी गितांजलीने एका मैत्रिणीला मी आत्महत्या करणार आहे असे सांगितले होते. त्यानंतर मैत्रिणीने रूमवर येऊन तिची समजूत काढली होती. काही वेळाने मैत्रिणीला शंका आल्याने ती पुन्हा गितांजलीकडे रूमवर आली. दार उघडत नसल्याने मैत्रिणीने गीतांजलीच्या बहिणीला कळविले. काही वेळातच गितांजलीचे भावजी तिथे आले. त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. त्यांना गितांजलीने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here