सोन्नलगी पुरस्कार | समाजातील कर्तुत्ववानांची पुजा चाकोते परिवाराने बांधली – सुशीलकुमार शिंदे

0

सोन्नलगी पुरस्काराचे थाटात वितरण

चाकोते परिवाराच्या तीन पिढ्यापासून समाजसेवेचे व्रत घेतलेले आहे आणि यातूनच सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून समाजातील कर्तुत्ववानांची पुजा त्यांनी बांधली आहे. असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. श्री रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित सोन्नलगी पुरस्काराचे वितरण तळेहिप्परगा येथील शॉवर अ‍ॅन्ड टॉवर वॉटर पार्कच्या परिसरात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सोन्नलगी पुरस्काराला मी गेल्या तीन वर्षापासून येतो. यापुर्वी हा पुरस्कार जानेवारी महिन्यातील ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर महाराज यांच्या अक्षता सोहळ्याच्या दिवशी करण्यात येत होता त्यालाही मी आर्वजुन उपस्थित राहायचो. स्वर्गिय बाबुराव चाकोते यांचा समाज सेवेचा वारसा विश्‍वनाथ चाकोते आणि आता त्यांचे दोन्ही मुले पुढे यशस्वीपणे नेत आहेत.सोलापूरमध्ये आपल्या कर्तुत्वाने वेगळा ठसा उमटवणार्‍या रत्नाचा गौरव चाकोते परिवाराकडून करण्यात येतो असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

प्रारंभी विश्‍वशंकर चाकोते यांनी आलेल्या मान्यवरांसह सर्वांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक करून या पुरस्काराची माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. नंतर प्रमुख अतिथी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सिध्देश्‍वर यात्रेतील मानाचा बाराबंदी आणि फेटा घालून सत्कार करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांची निवड कशी करण्यात आली याबाबत प्राध्यापिका नसीमा पठाण यांनी आपल्या मनोगता मधून सांगितले. त्यानंतर सोलापूरचे उद्योजक बालाजी अमाईन्सचे संचालक राम रेड्डी यांना सोन्नलगी रत्न, अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांना सोन्नलगी गौरव,पोलीस आयुक्त हरिष बैजल यांना सोन्नलगी श्री, केंद्रीय वस्तु व सेवा कर विभागाचे अधिक्षक संजय नाना कुलकर्णी यांना सोन्नलगी सन्मान आणि सौदर्य शास्त्राच्या तज्ञ सुनंदा महाराणा यांना सोन्नलगी सरस्वती या पुरस्काराने सुशीलकुमार शिंदे आणि श्री श्री श्री 108 श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागणसूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारानंतर उत्तर देताना पोलीस आयुक्त बैजल म्हणाले राजकीय आणि धार्मिक गुरूंच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने राजमान्यते सोबत देवमान्यताही मिळाली हे माझे भाग्य आहे. सोलापूरमध्ये मी केलेल्या अवघ्या काही दिवसाच्या कामाची ही पोहोच पावतीच आहे असे सांगून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तर हा पुरस्कार माझ्या कर्तुत्वाच्या शिरपेचात एक तुराच आहे असे बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी यांनी सांगितले. देशात मोठ्याप्रमाणात ओसाड जमीन आहे त्यावर आपले देशी वृक्ष ज्यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर असे वृक्ष आहेत ते लावले तर मुबलक पाणी आणि ऑक्सीजन मिळेल असा मोलाचा सल्ला अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांनी आपल्या मनोगतामधून दिला. नोकरी करीत असताना मातृभुमीचे ऋण फेडण्याची संधी मिळाली त्याचाच हा सन्मान आहे असे संजय नाना कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. आपल्या कामातून सौदर्य दिसले पाहिजे आंतर आणि बाह्य शरीराला मेकअप करण्यापेक्षा कर्तुत्वातून आपले सौदर्य दिसले म्हणूनच हा सन्मान मिळाला असे सुनंदा महाराणा यांनी यावेळी सांगितले. तर काम करताना आपले कर्तुत्व सिध्द करणार्‍यांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या प्रेरणेतून हा सोन्नलगी पुरस्कार सुरू केला असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते यांनी सांगितले.

समाजकारण, राजकारण आणि धर्मकारणाचा बॅलन्स चाकोते परिवाराने योग्य पध्दतीने सांभाळले. गुणांचा गौरव त्यांच्याकडून दरवर्षी करण्यात येतो हे सोन्नलगी नगरीसाठी फार महत्वाचे आहे असे श्री श्री श्री108 श्रीकंठ शिवाचार्य महाराज यांनी आपल्या आर्शिवचनातून सांगितले. प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या भुमिका पार पाडल्या तर समाज सुधारल्या शिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले. शेवटी विश्‍वराज चाकोते यांनी आभार व्यक्त केले तर वीणा बादरायणी यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी करून सोन्नलगी पुरस्कार सोहळ्याची उंची वाढवली. या कार्यक्रमाला मोठ्यासंख्येने चाकोते परिवाराचे मित्र मंडळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here