मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून ; करुनी कुळधर्म कुलाचार, अवघ्या जन्माचे पाप घटे 

0
करुनी कुळधर्म कुलाचार; अवघ्या जन्माचे पाप घटे 
महेश हणमे, 9890440480
येळकोट नामाचा करिता गजर आनंद भक्ताच्या मनी दाटे..
करुनी कुळधर्म कुलाचार अवघ्या सात जन्माचे पाप घटे..
एका म्हणे तोडिता लंगर, कडी एक तुटे नी सहस्त्र विघ्न हटे..
लोकगीतामध्ये कुळधर्म कुलाचार  लंगर , वारी , चे महत्व सांगितले आहे.श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबा मंदीरात या त्रा काळात हजारो भाविक  नवस फेडण्यासाठी , मागण्यासाठी , जागरण गोंधळ , जावळ काढणे , लंगर तोडणे  , तळी भंडार असे अनेक धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी भाविक मोठया श्रद्धेने येतात .
लोकगीतामध्ये कुळधर्म कुलाचार आणि लंगर चे महत्व सांगितले आहे. जागरण गोंधळ झाल्यानंतर लंगर (लोखंडी साखळी) तोडण्याचा विधी होतो. यावेळी साखळीचे एक टोक खिळ्यामध्ये अडकविले जाते तर दुस-या बाजूचे टोक लंगर तोडणा-च्या हातात असते, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या गजरात साखळीला हिसका देऊन कडी तोडली जाते. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडल्यास कडी सहज तुटते आणि एक कडी तुटल्यानंतर हजार विघ्न हटतात इतके महत्व लंगर तोडण्याच्या विधीला आहे अशी भाविकांची श्रद्धा असते. कड्यांची मोठी लोखंडी साखळी म्हणजे लंगर वाघ्या जागरणाचा विधी जाहल्यावर ही साखळी तोडतो याला लंगर तोडणे असे म्हणतात वाघ्याने हिसका दिल्यावर तुटलेला लंगर शुभ मानला जातो लंगर न तुटणे अशुभ मानले जाते.  हे लंगर वाघ्या खंडोबाचे शक्तीचे प्रतिक म्हणून तोडू लागला अशी आख्यायिका मोठी प्रसिद्ध  आहे. श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबा मंदीरात हा विधी यात्रा काळात मोठया उत्साहात पार पाडला जातो . श्रध्दाळू भाविकांची मोठी गर्दी यात्रा काळात असते .
मल्हार वारी
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून |
न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून ||
इंद्र व सकल देवगण गंधर्वांनी, कैलासावर भगवान शंकरासमोर दैत्यांचा संहार करण्याची व त्यांचे निर्दालन करण्याची वारी मागितली. आणि कालांतराने युद्ध होऊन मल्लासुराचा संहार केला, देवता गणांनी मागितलेली वारी सफल संपूर्ण झाली. हिच प्रथा कलीयुगामध्ये मल्हार वारी नावाने रूढ आहे. जागरणाचे वेळी वाघ्या मुरुळी वारीचे गीत गाऊन वारी मागतात, त्यावेळी वाघ्या किंवा मुरुळी, भाविकांनी दिलेली वारी पदरामध्ये घेतात. आजही मल्हारभक्त रविवारी, सोमवती, चंपाषष्ठी सारख्या उत्सवामध्ये सात घरी वारी मागतात. याच्या मागची संकल्पना अशी आहे कि, श्रीखंडोबा मानवी रुपामध्ये येऊन संकट निवारणाची वारी देऊन जातात. म्हणून श्रीक्षेत्र जेजुरी येथे कुळधर्म कुलाचाराचे वेळी वारी मागण्याची प्रथा आजही रूढ आहे. मल्हार वारीला मलूखानाची वारी असेही म्हणतात त्याला दंतकथेचा आधार दिला जातो तो असा, बादशाह औरंगझेब ने जेव्हा जेजुरगडावर स्वारी केली, तेव्हा मल्हारी मार्तंडाने अजामत (करामत) दाखविल्याने अजामतखान तसेच मलूखान नावाने जयजयकार करीत वारी मागितली. आजही मल्हारभक्त त्याप्रसंगाची आठवण म्हणून मलूखानाची वारी मागतात.
     वारी मागणे
कोटंबा
हे आयताकृती भिक्षापात्र असते ते लाकडाचे किवा धातूचे असते वाघ्या मुरुळी वारी मागताना यांचा उपयोग करतात. भाविक भक्त कुलाचाराचे वेळेस व वाघ्या मुरुळी वारी मागताना या कोटंब्याची पुजा करून कोटंबा धन धान्याने भरून दान करतात व तुज्या उपसाकाचे पूर्णपात्र आम्ही भरले आहे तू आम्हाला आमचे आयुष्य भरभरून दे हे दान खंडोबाला मागतात
      सकाळी स्नान करून हाती कोटंबा घेऊन किमान पाच घरे वारी मागितली जाते, भंडाराची वारी मागून मिळालेला भंडार देवावर उधळून मस्तकी धारण करतात, तर धान्य अथवा भोजनाची वारी मागितल्यास तो प्रसाद म्हणून भक्षण केला जातो. वारी रविवार, अमावस्या ,पौर्णिमा अश्या नियमाने मागून हे व्रत आचरिले जाते. मणि मल्ला पासुन रक्षणासाठी ऋषीगणांनी देवाकडे निराभिमानी होऊन याचना केली व देवाने त्यांचे रक्षण केले. तेव्हा ऋषींनी निराभिमानी होऊन तुझी वारी मागणार्यांचे रक्षण कर असा वर मागितला व देवांनी तो दिला म्हणून वारी मागितली जाते
दिवटी 
ही धातू पासून बनवलेली असते दिवटीेच्या वरील भागात एक पात्र असते त्यात कापडाचा पलीदा लावून त्याचे वर बुदलीने तेल टाकून जाळले जाते खरेतर हे मशालीचेच वेगळे रूप या दिवटीचा उपयोग देवाला ओवाळण्या साठी केला जातो खंडोबाचे कुलाचारात महत्वाचे स्थान असल्याने कुलदेवत खंडोबा असणाऱ्या सर्वच देवघरात दिवटी असते
खंडोबाची वारी
विशिष्ट नियमाने एखाद्या खंडोबा क्षेत्री जाणे याला खंडोबाची वारी करणे असे म्हणतात तर अशी वारी करणार्यांना खंडोबाचा वारकरी म्हटले जाते. खंडोबा क्षेत्री रविवार, अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, अथवा विशिष्ट यात्रांना नियमाने नियमित जाणे म्हणजे वारी करणे होय. विशिष्ट दिवस व क्षेत्र यांचा भेटीचा नियम आचरून वारीचे व्रत आचरिले जाते
खेटी घालणे
एखादा विशिष्ट संकल्प करून खंडोबा क्षेत्रास दर्शनास नियमाने जाणे यास खेटी घालणे असे म्हणतात . रविवार, अमावस्या, पौर्णिमा, अश्या खंडोबा उपासनेतील दिवसाची निवड करून ५, ७, ११, अश्या विषम संख्येत सलग त्या दिवसांना क्षेत्र दर्शनाचा संकल्प करून तो पुर्ण केला जातो. शेवटच्या खेटी वेळेस खंडोबाचा कुलधर्म कुलाचार करून खेटीचा संकल्प पुर्ण केला जातो
कावड घालणे
नदी वरून अथवा जलाशयावरून पाण्याने भरलेला कलश आणून देवास घालणे यास कावड घालणे असे म्हणतात. मनोऐछिक दिवस व कालावधी यांचा संकल्प करून खंडोबा क्षेत्री कावड घातली जाते सकाळी उठून जलाशयावर जाऊन स्नान करून कावड भरून ते पाणी मंदिरात देवास घालून भंडार वाहुन कवडीचा नेम पुर्ण केला जातो
उदक दान
माघ वद्य चतुर्दशी ते वैशाख अमावस्या या कालावधी मध्ये रस्त्यावर मल्हारी नामाने पाणपोई निर्माण करून प्रवाश्यांना पाणी दान करणे म्हणजे उदकदान व्रत होय.
अश्विन शनिवार व्रत
अश्विन महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी उपवास धरून , रात्री देवास दुग्ध अभिषेक करतात , देवास पक्वानाचा नेवेध्य दाखवून , रात्री देवाचा जागर केला जातो. रविवारी अन्नदान करून उपवास सोडतात.
रविवार व्रत
प्रत्येक रविवारी उपवास धरला जातो मध्यान्ह वेळी देवाचे पुजन करून नेवेध्य दाखवून प्रसाद भक्षण करून उपवास सोडतात, व रात्री फराळ केला जातो. श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबा हा सर्व जातीधर्माचा देव आहे . हा माझा  देव भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो , लेकराबाळांच्या सरंक्षणासाठी सज्ज असतो अशी धार्मिक भावना खंडेरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांमध्ये भरलेली दिसून येते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here