‘सदानंदाचा येळकोट’-‘तळी’चे ताम्हण मस्तकी ; भंडारा उधळू आकाशी 

0
महेश हणमे,9890440480
 
खंडोबा तसा अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रीयन भाषिक लोकांचा कुलदैवत आहे. प्रामुख्याने कोकणपट्टी ओलांडली तर मराठवाड्यापर्यंतच्या भागातील लोकांचा तो कुलदैवत आहे. शिवाय कुलदेवी वेगवेगळी असली तरी, अनेकांचा कुळदेव एकच… सर्वजनाचा, बहुजनांचा खंडोबा. आणि म्हणूनच श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबा मंदिरात नेहमीच भक्तांची वर्दळ ही असते.
तळीभंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे. ज्या घरात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक घरामध्ये तळी भंडार हमखास होतोच. प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला घरातील देवासमोर तळीभंडार करण्याची प्रथा असते तर काही घरांमध्ये विजयादशमी ( दसरा ) व चंपाषष्ठी यादिवशी हा विधी होत असतो. तळी भंडारा विषयी सांगितले जाते मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींना जो आनंद झाला त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला त्याचेच तळी भंडार हे प्रतिक आहे.जेजुरी मंदिरामध्ये भंडारगृह,बारद्वारीमध्ये किंवा पितळी कासवावर तळी भंडाराचा विधी केला जातो. घरातील देवासमोर केला जाणारा विधी व मंदिरामध्ये केला जाणारा विधी यामध्ये थोडा फरक आहे.
देवापाशी आल्यानंतर आपली सर्व दुःख उधळून देवून देवापाशी आनंद मागितला जातो.
खोब-याचे तुकडे व भंडार उधळला जातो.खोब-याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत जसे आपला वंश खोब-याच्या कुटक्यासारखा एकास दोन दोनास चार असा वाढत जावा तर दुसरे असे की पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडारा बरोबर उधळल्या जात असत, परंतु कालौघात मोहरा शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते.सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्वाचा अंतःकरणापासून दिलेली हाक देवाला पोहोचते. घरी देवासमोर केला जाणारा तळी भंडाराचा विधी ताम्हणामध्ये विड्याची ( नागिणीची ) पाने, सुपारी , खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन तीन -पाच- सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन ‘सदानंदाचा येळकोट’ च्या गजरात ताम्हण उचलले जाते. तदनंतर पानाचा विडा ठेवला जातो .काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी,रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात, त्यावर ताम्हण ठेवले जाते.एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणा-या प्रत्येकापुढे एक एक विडा ठेवला जातो देवाला भंडारा वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा  लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते.सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते.अत्यंत आनंदी वातावरणात ,जल्लोषात हा विधी खंडोबा मंदिरात केला जातो .देव भावाचा भूकेला असल्याने आम्ही भोळ्या भावाने केलेली कोणतीही सेवा देव रुजू करून घेतो हि भावना अनेक भक्त्यांच्या मनात असते .
 धार्मिक विधीचे सुंदर वर्णन ..
स्वच्छ विस्तीर्ण पात्र असावे l त्यामाजी अष्टदळ काढावे l
भंडारे पूरित करावे l मध्ये कलश स्थापिजे ll
नागवेलीदळेकरून l कलश सुशोभित करावा जाण l
कलशात पूर्णपात्र नारळ ठेवून l तळीकेचे पूजन करावे ll
मुष्टीभंडार आत ठेवावा l आप्त परकीय समुदाय मेळवावा l
येळकोट नामाचा उच्चार करावा l एकावच्छेदे करुनिया ll
तळी उचलून आधारपात्रावर ठेविजे l मग भंडार सर्वांस लाविजे l
प्रसाद सर्वांस वाटीजे l अत्यादरेकरुनिया ll
तळी भरावयाचे समयी l दीपिका करी असावी l
मग तळी पुन्हा उचलावी l मस्तकी धारण कीजे ll
 
              अशाप्रकारे तळीभंडार हा धार्मिक विधी मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र बाळे येथील खंडोबा मंदिरात केला जातो . हा विधी पूर्ण केल्याने कुटुंबात शांती ,समाधान प्राप्त होते . देव खंडेराय भक्तांच्या कल्याणासाठी , संरक्षणासाठी सज्ज असतो अशी निर्मळ व पवित्र भावना भाविकांच्या मनात असते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here