मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी शिवराजसिंग चौहान

0

MH13NEWS Network

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी ज्येष्ठ भाजप नेते शिवराजसिंग चौहान यांचा शपथविधी पार पडला आहे. राजभवनातील एका साध्या समारंभात राज्यपाल लालजी टंडन यांनी शिवराजसिंग चौहान यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.सोमवारी शिवराजसिंग चौहान यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर काँगेस नेते कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपद मिळाले होते. तथापि, आपले सरकार टिकवून धरण्यात काँगेस अपयशी ठरली. ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या गटातील 22 काँगेस आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा त्याग केल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात आले. परिणामी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. ते चौथ्यांदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. यापूर्वी ते 2005 ते 2018 अशी सलग 13 वर्षे मुख्यमंत्रिपदी होते. त्यांच्या पदग्रहणामुळे राजकीय अस्थिरता संपुष्टात आली आहे.

सर्व आमदार मास्क घालून…

कोरोना विषाणूच्या संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने भाजपच्या विधानसभा सदस्यांची बैठक येथील मुख्यालयात बोलाविण्यात आली होती. सर्व आमदार मास्क घालून आले होते आणि एकमेकांपासून एका खुर्चीचे अंतर राखून बसले होते. या बैठकीला राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे आणि अरूण सिंग हे केंद्रीय निरीक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या बैठकीत शिवराजसिंग चौहान यांच्या नावाचा प्रस्ताव संमत झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here