‘मरकज’मधील सहभागी लोकांनी पुढे येऊन तपासणी करावी – मुख्यमंत्री

0

मुंबई दि १: दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, प्रसंगी मी स्वत: त्यांच्या आयोजकांशी बोलेल पण कोरोनाचे संकट जाऊस्तोवर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

आज त्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला त्यावेळी अधिक काळजी घेण्याच्या आणि मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहनही केले.

बाजारांमध्ये गर्दी दिसता कामा नये

मुख्यमंत्री म्हणाले की, विलगीकरणाचे पालन झालेच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी दिसली नाही पाहिजे यासाठी जे जे तुमच्या अधिकारांत आहे ते करा. आपण नागरिकांच्या सुविधेसाठी २४ तास दुकाने उघडी ठेवली आहेत मात्र काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत असे दिसते. भाजीबाजारांमध्ये सुद्धा सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा. अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आहेत ,त्यामुळे देखील गर्दी वाढते. एकतर तेथील बाजाराला दुसरीकडे मोकळ्या जागेवर हलवा किंवा वेळा ठरवून द्या.

महसूल प्रशासनाचे कौतुक

आरोग्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, आणि कायदा व सुव्यवस्था अशा तीन आघाड्यांवर आपल्याला लढावे लागत आहे. आज साधारणपणे १ महिना झाला आहे. ज्याप्रमाणे आरोग्य यंत्रणा, पोलीस राबताताहेत त्याप्रमाणे राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व महसूल यंत्रणा २४ तास काम करते आहे, त्यासाठी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विशेषत: आपल्याला ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. पुणे परिसरात बरीच वृद्धाश्रमे आहेत त्यांचीही मदत आपण घेऊ शकतो का ते पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here