Zp नवलच ! भर उन्हाळ्यात पूर्ण वेळ शाळा ; ‘अभ्यासू’ अधिकाऱ्याने दिला आदेश

0

महेश हणमे, /9890440480

संपूर्ण राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात तापमान मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.सध्या 36 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान आहे. आरोग्य विभागाने दुपारी 12 ते 3 वेळेत नागरिकांनी शक्यतो बाहेर पडू नये असे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. मात्र सोलापुरातील समाजकल्याण अधिकाऱ्याने दिव्यांगांच्या शाळा पूर्णवेळ भरवा असे आदेश काढल्याने त्यांच्या आदेशाची चर्चा सर्वत्र होत आहे.

सोलापुरात फक्त तीनच ऋतू असे म्हटले जाते .उन्हाळा उन्हाळा आणि उन्हाळा. यातच सोलापूर की शोलापूर असे वातावरण असताना जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी 3 मार्च रोजी अचानकपणे दिव्यांग शाळा या पूर्ण वेळ घ्याव्यात असे आदेश काढले …सरकारी काम आणि सहा महिने थांब या बाबीला फाट्यावर मारून ताबडतोब आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. भर उन्हाळ्यात अस्थिव्यंग, मतिमंद, मूकबधिर मुला -मुलींच्या निवासी शाळा पूर्णवेळ भरवा असे या आदेशात नमूद केले होते.

पालकमंत्र्यांचा दौरा..
सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शनिवारी व रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या परखड स्वभावाची चुणूक त्यांनी याआधीच बैठकीमध्ये दाखवली आहे.
पालकमंत्री विखे पाटील यांच्यापर्यंत हा विषय गेल्यास आपली नाचक्की होईल हे लक्षात आल्याने त्याच रात्री समाजकल्याण अधिकाऱ्याने आणि जिल्हा प्रशासनाने यु टर्न घेतला असल्याची चर्चा रंगली. परंतु पालकमंत्र्यांची पाठ वळताच भर दुपारी शाळा सुरू ठेवा हा आदेश जैसे थे ठेवण्याचे काम समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केले.

मार्च महिन्यामध्ये उन्हाचा पारा चढलेला असतो. सद्यस्थितीत उष्माघातामुळे आणि बदललेल्या वातावरणामुळे अनेक जण आजारी पडलेले आहेत. यामध्ये ताप, खोकला, घशात खवखवणे आजाराचे रुग्ण घरोघरी आढळत आहेत .विशेष म्हणजे लहान मुलांमध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान ज्यांना आपली भावना शब्दाद्वारे व्यक्त करता येत नाही अशा दिव्यांग मुला- मुलींना वेठीस धरण्याचे काम समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केल्याने या आदेशास विरोध वाढतो आहे.

जिल्ह्यात काय आहे परिस्थिती..

मनपाच्या 397 शाळा सकाळच्या सत्रात…

सोलापूर महानगरपालिकेच्या 397 शाळा सकाळी साडेसात ते साडे अकरा या वेळेत सुरू आहेत. ज्या शाळांमध्ये दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र आहे. त्या ठिकाणी सकाळच्या सत्रात साडेनऊ वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवावी असे निर्देश सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी हनुमंत जाधवर यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात…
भरवाव्यात असे आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी 28 फेब्रुवारी रोजीच काढले होते.

उन्हाची वाढती तीव्रता पाहून सकाळच्या सत्रात जिल्हा परिषदच्या सर्व प्राथमिक शाळा साडेसात ते साडे अकरा या वेळेत भरवाव्यात असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दिनांक एक मार्चपासून या आदेशांची अंमलबजावणी सुरू आहे.

ज्या परीक्षा केंद्रावर दहावी -बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्या ठिकाणी परीक्षांच्या वेळेचे नियोजन करून माध्यमिक विद्यार्थ्यांचे वर्ग हे सकाळच्या वेळेस भरवण्यात येतात. काही ठिकाणी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी परीक्षा संपल्यानंतर दुपारच्या वेळेस काही वर्ग भरवण्यात येतात. त्याचसोबत राज्यात ज्याप्रमाणे सकाळच्या सत्रात वर्ग भरावेत असे आदेश आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी वठारे यांनी दिली.

वाचा ,   समाजकल्याण अधिकारी काय म्हणतात..
अभ्यास करतोय..!…

समाज कल्याणच्या अखत्यारीत असलेल्या दिव्यांग शाळेच्या वेळेत बदल करण्यात येतील .त्याबाबत अभ्यास करतोय…या आठवड्यात सुधारित वेळेबाबत परिपत्रक काढण्यात येईल. दरम्यान, तोपर्यंत दुपारच्या वेळेत शाळा सुरू राहतील अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी एम एच १३ न्यूजशी बोलताना दिली.

अभ्यास पूर्ण होईपर्यंत काय..?
समाज कल्याण अधिकाऱ्यांचा वेळेत बदल करण्याचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत उष्णतेमुळे दिव्यांग निष्पाप मुलामुलींना काही अपाय झाल्यास या अभ्यासू अधिकाऱ्यास प्रशासन जबाबदार धरणार का.? प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणात ताबडतोब लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.

सीईओ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष..
जिल्हा परिषदेचा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून संदीप कोहिनकर यांच्या सक्षम नेतृत्वाची आणि संवेदनशील प्रशासन अधिकाऱ्याची प्रतिमा सर्वांसमोर आली. दिव्यांग विद्यार्थी- विद्यार्थिनींना भर उन्हाळ्यात वेठीस धरणाऱ्या समाजकल्याण अधिकाऱ्याचा ते कशा पद्धतीने अभ्यास घेतात याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here