आता… होणार समर्थांचे दर्शन ;वटवृक्ष मंदिरात स्वच्छता मोहिम

0

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर गाईडलाईन्स जारी करून गुरुवार दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याचे जाहीर केले असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे वटवृक्ष मंदिरही भाविकांच्या स्वामी दर्शनाकरिता उघडण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर उघडणार आहे. वटवृक्ष मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापना व श्री देवीजींच्या मूर्तींची स्थापना ही प्रतिवर्षी होत असते. या पार्श्वभूमीवर मंदिर उघडणे व नवरात्र प्रक्षावळ पूजेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम येथील श्री वटवृक्ष मंदिरात मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे पुरोहित मंदार पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.

याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान गेल्या २५ मार्च २०२१ पासून म्हणजेच गेल्या साडे सहा महिन्यापासून वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर बंद आहे. या कालावधीत मंदिर परिसरातील विविध कामे चालू होती, परंतु आता गुरुवार दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर उघडणार असल्याने व तसेच गुरुवारी घटस्थापना असल्याने याचे औचित्य साधून मंदिर स्वच्छता करण्याचे मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच दिनांक सात आक्टोंबर रोजी मंदिर उघडल्यानंतर शासनाने मार्गदर्शित केलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे वटवृक्ष मंदिरात स्वामी भक्तांची स्वामी दर्शनाची सोय केली जाईल.

याप्रसंगी मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे केले जाईल, तसेच ठराविक अंतराने भाविकांना टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात येईल. मंदिरातील कोणत्याही परिसरात भाविकांची सामूहिक गर्दी होऊ देणार नाही.

मंदिरात विविध परिसरात भाविकांना सॅनिटायझरचा पुरवठा केला जाईल. तसेच कोरोना विषयी जनजागृती म्हणून मंदिर समितीद्वारे वेळोवेळी नियमितपणे शासनाच्या कोरोना बद्दलच्या गाईडलाईन्सचे अनाउन्समेंट करण्यात येईल. अशा पद्धतीने भाविकांची दर्शन घेण्याची सोय केल्यास  निश्चितच कोरोना संसर्ग पसरणार नाही अशी आशा व्यक्त करण्यात आली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here