‘महा’जनादेश : सोलापूर भाजपमय ; अमित शहांच्या भाषणाची उत्सुकता.!

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करणार पक्षप्रवेश

0

महेश हणमे,MH13,news

आज शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे मंत्री आणि दिग्गज मंडळी येत आहेत. त्यामुळे महा जनादेश यात्रेच्या समारोपाच्या प्रसंगी संपूर्ण सोलापूर भाजपमय झाला आहे.आजच्या सभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भाषणांची अनेकांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. भाजपच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा समारोप सोलापुरात होत आहे.

मराठवाड्यातून सोलापूर जिल्ह्यात रविवारी भाजपच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा प्रवेश होत आहे. जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून ‘महाजनादेश’ यात्रा शहरात प्रवेश करणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक, मॅकेनिकी चौक, सरस्वती चौक मार्गाने पार्क मैदानावर यात्रेचा समारोप होणार आहे. पार्क मैदानावर होणार्‍या समारोपाच्या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

जम्मू काश्मिर येथील ३७० कलम रद्द केल्यानंतर अमित शहा यांचा महाराष्ट्रातील पहिलाच दौरा सोलापूर येथे होत असल्यामुळे या यात्रेला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, जनता हेच आपले दैवत आहे आणि या दैवतेचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून मागील पाच वर्षे सरकारने जनतेच्या आशीर्वादाने केलेल्या कामाची माहिती देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बलशाली राष्ट्र करत आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बलशाली व वैभवशाली महाराष्ट्र करावयाचा आहे. त्या महाराष्ट्रासाठी जनतेचा जनादेश तसेच आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोलापूरात येत असून येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेवर भाजपा- महायुतीचा झेंडा लावण्याचा निर्धार करण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आली असल्याची माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली आहे.

शेकडो पोस्टर्स, झेंडे, बॅनरमुळे वातावरण निर्मिती
भाजपच्या कार्यालयातून शिस्तबद्ध पद्धतीने पदाधिकाऱ्यांना कामे वाटून दिली होती.त्यानुसार शहरात ठिकठिकाणी शेकडो पोस्टर्स लावण्यात आले आहेत. बाळे चौक ते पार्क मैदान पर्यंत विविध ठिकाणी मोठ्या आकाराची बॅनर लावण्यात आले.तसेच जागोजागी पक्षाचे झेंडे लावण्यात आल्याने वातावरण निर्मिती झाली आहे.

मेगाभरती होण्याची शक्यता..!

भाजप मध्ये अनेक नेत्यांची मेगा भरती करण्यात येणार आहे.  आजच्या सभेत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राणा जगजीत सिंह, धनंजय महाडिक,जयकुमार गोरे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.याच वेळी पक्ष प्रवेशाची घोषणा केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here