राष्ट्र निर्मितीमध्ये भारतीय पोस्टाचे अमुल्य योगदान – ए.व्यंकटेश्वर रेड्डी

0

जागतिक टपाल दिनानिमित्त सुमेध फाऊंडेशनच्या वतीने सोलापूरच्या भारतीय डाक सेवेतील कर्मचाऱ्यांचा सन्मान

भारताच्या मोठ्या शहरांपासून ते दुर्गम खेडोपाड्या पर्यंत पत्रव्यवहार, पार्सल आणि बँकींग इत्यादी सेवांचे उत्कृष्ट जाळे असलेली सरकारी यंत्रणा म्हणजे भारतीय डाक सेवा. माहिती तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन भारतीय डाक सेवा कात टाकत असून स्पर्धात्मक युगात ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारतीय डाक सेवेच्या कर्मचाऱ्यांच्या अविरत देशकार्यामुळेच त्यांचा राष्ट्र निर्मितीमध्ये अमुल्य योगदान असलेल्याचे गौरवोद्गार सोलापूर विभागाचे वरिष्ठ पोस्ट अॉफिस अधिक्षक ए.व्यंकटेश्वर रेड्डी यांनी काढले.

जागतिक टपाल दिनानिमित्त सुमेध फाऊंडेशनच्या वतीने सोलापूरच्या भारतीय डाक सेवेतील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना आणि लॉकडाऊन काळात मोठ्या धैर्याने सर्व भारतीय डाक सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांची देशसेवा चोखपणे बजावली. टपाल खात्या विषयी सर्व भारतीयांमध्ये विशिष्ट आदरभाव आणि स्नेहपूर्ण स्थान असून, प्रत्येक भारतीय भारतीय डाक सेवेतील कर्मचाऱ्यांना कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच पाहतो असे सुमेध फाऊंडेशनच्या अध्यक्षा जानवी माखिजा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगा पर्यंत भारतीय डाक सेवेचे कार्य नाविन्यपूर्ण उपक्रम, सुयोग्य काटेकोर नियोजनबद्ध कार्यामुळेच भारतीय डाक सेवेचा जगभर नावलौकिक आहे असे सुमेध फाऊंडेशनचे मार्गदर्शक योगीन गुर्जर यांनी कौतुक केले.

ह्यावेळी सुमेध फाऊंडेशनचे संचालक मल्लिकार्जुन अष्टगी, गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव, प्रसाद वणवे, हेमंत निंबर्गी, रुपेश जाधव, संध्याराणी बंडगर, भक्ती जाधव, विद्या भगरे-भोसले, सोलापूर मुख्य पोस्ट अॉफिस मधील श्रीमती देवूर (प्रधान डाकपाल ) श्रीरंग रेगोटी,खातेप्रमुख, अधिकारी, पोस्टमन, कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत अंजुटगी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सुहास भोसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here