अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे वाढणार प्रचंड रोजगार : सी.ए. एम.जी मालू

0

सोलापूर : अर्थसंकल्पात केलेल्या आरोग्य, रस्ते, रेल्वे आणि इतर क्षेत्रातील भरीव तरतुदींमुळे देशात प्रचंड रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन सी.ए. एम.जी. मालू यांनी केले.

भाजपा व्यापारी आघाडीतर्फे शनिवारी टीडीएफ सभागृहात आयोजिलेल्या अर्थसंकल्पावरील व्याख्यानात श्री. मालू यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, भाजपचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने, जयवंत थोरात, उपाध्यक्ष भूपती कमटम, व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास दायमा, व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष जयंत होले – पाटील, महिला आघाडी शहर अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष तिलोकचंद कासवा, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, कोषाध्यक्ष अंबादास बिंगी उपस्थित होते.

सी.ए. मालू म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात शासनाने खर्च मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे. यात आरोग्यासाठी २ लाख ३७ हजार कोटी रुपये, एक लाख १८ हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी, रेल्वेला एक लाख १० हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशाला सर्वाधिक उत्पन्न जीएसटीतून मिळते. त्या खालोखाल उत्पन्न कंपनी टॅक्स आणि इन्कम टॅक्समधून मिळते. पूर्वी एक कोटी १४ लाख असलेली करदात्यांची संख्या आता तब्बल ६ कोटी ३५ लाख इतकी झाली आहे. यातून मिळत असलेल्या उत्पन्नातून शासनाने मागीलवर्षीपेक्षा ३४ टक्के अधिक खर्चाची तरतूद केली आहे. सध्या देशात २८ ते ३० किमीचे रस्ते दररोज बनत आहेत. ते वाढवून आता दररोज ४० किमीचे रस्ते बनविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यातून सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळणार आहे, असेही श्री. मालू म्हणाले.

उज्वला योजना, ऑटोमोबाईल क्षेत्राला ऊर्जा मिळण्यासाठी स्क्रॅप पॉलिसी अशा निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी व्यापारी आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, व्यापारी आघाडी प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीनिवास दायमा यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्ष जयंत होले- पाटील यांनी प्रास्ताविक केले. छोट्या उद्योजकांना आत्मनिर्भर करण्यासाठी भाजपा व्यापारी आघाडी कार्यरत राहील असे श्री. होले -पाटील यांनी यावेळी सांगितले. भाजप शहर चिटणीस नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन तर मुद्रा योजना प्रमुख सुकुमार सिध्दम यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास नगरसेवक श्रीनिवास पुरुड, नगरसेविका वंदना गायकवाड, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, विजय उडता तसेच कारखानदार, व्यापारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here