साहेब,सुनेच्या पोटात लई दुखतय ओ.. अन् या पोलिसांनी…

0

महेश हणमे 9890440480 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण संचारबंदी लागू झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य आणि पोलिस प्रशासनावर प्रचंड मोठा ताण असलेला दिसून येतो. पोलिसांनी काठी फिरवली की मानव अधिकारवाले जागे होतात ,अरे पण माणसंचं राहिला नाही तर अधिकार कुठून आले.असो… पण काठी फिरवणाऱ्या हातामधून मायेचा ओलावा अनेकदा दिसून येतो,याचं प्रत्यंतर सोलापुरातील एका पोलीस अधिकाऱ्याने दाखवून दिलं त्याचं झालं असं की..

काल मंगळवारी रात्री साधारण 12 वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीत रुटीन प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील त्यांच्या सहकाऱ्यासह रात्रगस्त करत होते.तेव्हा त्यांना दोन महिला एक पुरुष रामवाडी दवाखान्याजवळ थांबलेले दिसून आले. एकतर संचारबंदी त्यात रात्री बारा वाजता ही माणसं कुठे निघाली याची चौकशी पाटील यांनी केली तेव्हा खरा प्रकार लक्षात आला.

पाटील यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता “साहेब रिक्षा नाय, कोणती गाडी नाय…आन सुनेच्या पोटात लई दुखतय… काय करावं म्हणून, चालत निघालोय. काय करणार ? हतबल झालेल्या या सासूने पोलिसांना आपली अगतिकता दाखवली.

गर्भवती असलेल्या रविना विजय काळे वय वर्षे 25 यांच्या पोटात दुखत असल्याने विव्हळत असलेल्या दिसून आल्या.सोबतीला तिचा पती विजय काळे, सासू सिंधू काळे होते. पोटात वेदना होऊ लागल्या आणि जाण्यासाठी कोणत्याही वाहनाची सोय नव्हती. त्यामुळे हे कुटुंब पायी चालत सिव्हिल हॉस्पिटल कडे निघालं होतं.

सपोनि विजयानंद पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोबत असलेल्या चालक पोलिस शिपाई बक्कल नंबर 689/बेलछत्रे यांना सूचना दिल्या.आणि लगेचच त्या गर्भवती महिला रविना आणि सासूला शासकीय पोलिस वाहनात बसविले आणि पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. वर्दीतील या देव माणसाला सासूने डोळ्यात पाणी आणून हात जोडले आणि आशीर्वाद दिला.

हा विषाणू माणुसकी नाही संपवू शकत…

अत्यावश्यक असेल तर मीच काय वर्दीतील प्रत्येक माणूस हा सेवेसाठी तत्पर असतो. परंतु अनेकदा वेगवेगळी कारणे सांगून लोक विनाकारण फिरताहेत. त्यामुळे विषाणूंचा संसर्ग होत आहे. त्या गर्भवती मातेला रूग्णालयात दाखल करणे एक सामाजिक कर्तव्य होते.आणि ते केले. आम्ही पोलीस मंडळी पण माणसंचं आहोत.हा विषाणू माणुसकी नाही संपवू शकत…
विजयानंद पाटील
सहाय्यक पोलीस निरीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here