दिवाळीला 15 टक्के बोनस द्या ,अन्यथा… – आडम मास्तर

0

सोलापूर दिनांक – सरकार कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी चा पर्याय स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी ची प्रक्रिया अद्याप चालू आहे .या दरम्यानच्या काळात हे करताना कष्टकरी कामगारांना कामापासून वंचित राहावे लागले. यामुळे उपासमार आणि भूकबळी ला सामोरे जावे लागले.ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.पण कारखानदारांनी माणुसकीचे दर्शन घडवत यंदा सर्व यंत्रमाग कामगारांना सानुग्रह कायदा 1965 नुसार 15 टक्के बोनस देऊन दिवाळी गोड करावी अन्यथा कारखाण्यासमोरच ऐन सणासुदीला कामगार ठिय्या आंदोलन करतील असा इशारा यंत्रमाग कामगारांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना दिला.

बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सिटू संलग्न लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने दत्त नगर लाल बावटा कार्यालाय येथे सिटू चे राज्य महासचिव अँड एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ कामगार व महत्वाचे निवडक कार्यकर्ते यांची दिवाळीला यंत्रमाग कामगारांना 15 टक्के बोनस मिळण्यासंबंधी विस्तारित बैठक पार पडली.

ते बोलताना पुढे म्हणाले कि, 10 जानेवारी 1986 साली यंत्रमाग कामगारांना किमान वेतन निश्चित करून अधिसूचना काढण्यात आली. मा. उच्च न्यायालयाने 29 जानेवारी 2015 रोजी सुधारित किमान वेतन जाहीर केले. सदर निर्णयास यंत्रमाग धारकांनी कडाडून विरोध केला. मा. कामगार आयुक्त एच.के.जावळे यांच्या अध्यक्षतेखाली 17 फेब्रुवारी 2015 रोजी तज्ञ समितीची निवड करण्यात आली. या समितीने 2 फेब्रुवारी 2016 ला तज्ञ समितीचा अहवाल सादर केले. या अहवालात म्हंटले आहे कि, सदर निर्णयाची अमलबजावणी टाईम रेट कि पीस रेट (वेळेवर दर निश्चिती कि नगावर दर निश्चिती) यामुळे निर्णय अद्याप प्रलंबित आहे.


वास्तविक पाहता एका दिवसातील 8 तासाला, एका कामगाराला, एका यंत्रमागावर 515 रुपये किमान वेतन मिळणे अपेक्षित आहे. मात्र तसे आजमितीस घडलेले नाही. किमान वेतनाच्या अमलबजावणीसाठी मा. सहा. कामगार आयुक्त यांच्याकडे 445 कारखान्यातील 3155 प्रकरणे दाखल केलेले आहेत.

आज शहरात एकूण 1246 कारखाने असून यामध्ये 13850 यंत्रमाग आहेत. जवळपास 42764 कामगार आहेत. या कामगारांना किमान वेतनासहित भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळावा म्हणून लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन (सिटू) च्या मार्फत न्यायालयीन लढा सुरु आहे. सदर उच्च न्यायालयात कामगारांच्या बाजूने युनियनची भूमिका सक्षम आणि समर्थपणे मांडले जात आहे. आज सबका साथ, सबका विकास म्हणणारे केंद्र सरकार कामगारांचे जीवन विध्वंसाकडे नेत असल्याची टीका आडम यांनी केली. कारण सर्व कामगार कायदे पायदळी तुडवून कामगारांची रोजीरोटी मालकांच्या मर्जीवर सोडून दिलेले आहे. ही मोठी शोकांतिका आहे. यासाठी न्याय हक्काची लढाई यशस्वी करण्यासाठी कामगारांच्या एकजुटीची गरज आहे.

यावेळी बैठकीचे प्रस्ताविक किशोर मेहता यांनी केले. आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले.

यावेळी व्यासपीठावरील व्यंकटेश कोंगारी,युसूफ मेजर,नलिनीताई कलबुर्गी आदींनी मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर शंकर गड्डम, लक्ष्मण माळी, महादेव घोडके ,अनिल वासम आदी उपस्थित होते.

सदर बैठक यशस्वी होण्यासाठी बाबुराव कोकणे, शहाबुद्दीन शेख, मनीषा लोखंडे, दीपक निकंबे, अंबादास बिंगी, रवि गेंट्याल, किशोर गुंडला, लक्ष्मीनारायण जोरीगल, आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here