गणेश भक्तांनो पिण्याचे पाण्याचे संवर्धन करा – पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे
सोलापूर,:- हिप्परगा तलावातील पिण्याच्या पाण्याचे संवर्धन व्हावे यासाठी गणेश भक्तांनी तलावात गणपती मुर्तीचे विसर्जन न करता जवळच्याच पाण्याने भरलेल्या दगड खाणीत गणपती मुर्तीचे विसर्जन करावे अशी मागणी हिप्परगा ग्रामस्थांकडून करण्यात आली त्यावरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी हिप्परगा तलावाची आणि खाणीची पाहणी केली आणि गणेश भक्तांनी तलावात गणपती मुर्ती विसर्जन करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले. दरम्यान मुर्ती तलावात विसर्जन करण्यास प्रतिबंध करावा अशा मागणीचे निवेदन हिप्परगा ग्रामपंचायतीकडून पोलीस निरीक्षक शिंदे यांना देण्यात आले.
प्रत्येक सजीव पशु, पक्षी, आणि मानवाला पाण्याची आवश्यकता आहे. पाणी हे जीवन आहे. यापुढील काळात पाण्यावरून महायुध्द होवू शकते असे भाकीतही काही तज्ञांनी केले आहे. म्हणून निसर्गाने दिलेले हे पाणी आपण प्रत्येकाने जपून वापरले पाहिजे. यंदा गणरायाच्या आशिर्वादाने चांगला पाऊस झाला आहे सर्वच जलस्त्रोत भरलेले आहेत त्याप्रमाणे सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुका, अक्कलकोट तालु्नयातील काही गावांच्या पिण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा हिप्परगा तलाव तुडुंब भरला आहे या तलावातील पाण्याचे संवर्धन केले पाहिजे म्हणूनच गणेश मुर्ती विसर्जन करताना नागरीक भाविक भक्तांनी हिप्परगा तलावात गणपती मुर्तीचे विसर्जन न करता शहराच्या लगत असलेल्या अनेक खाणी आहेत त्या बंद पडलेल्या आहेत त्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. त्या खाणीतच गणपती मुर्तीचे विसर्जन करावे. जेणेकरून हिप्परगा तलावात गाळ होणार नाही आणि पाण्याची क्षमता टिकून राहील आणि नागरीकांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
हिप्परगा तलावात गणेश मुर्ती विसर्जन झाल्याने माती वाढेल, मुर्ती वरील रंग पाण्यात मिसळून पाणी गढूळ होवून प्रदुषित होणार आहे त्यामुळे पशु पक्ष्यासह मानवाच्या आरोग्यालाही धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे गणेश मुर्ती विसर्जन हिप्परगा तलावात न करता बंद पडलेल्या खाणीत करावे असे आवाहन सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले. त्यादृष्टीने त्यांनी हिप्परगा तलाव तसेच शहराच्या सीमेवर असलेल्या सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील बंद पडलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खाणीची पाहणी केली.
तलावात विसर्जन नको – हिप्परगा ग्रामपंचायतीकडून निवेदन
हिप्परगा तलाव हा एैतिहासिक आहे आणि सध्या त्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याचा साठा आहे. तलावात गणपती विसर्जन करून तलावातील पाणी प्रदुषित करू नये सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, सोलापूर महानगर पालिका आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष देवून हिप्परगा तलावात गणपती मुर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाला देण्यात आले. यावेळी सरपंच गुरलिंग धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य विशाल कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष रियाज पटेल, बाळकृष्ण जाधव आदीं उपस्थित होते.