वाचा: ‘गाड़ीवाला आया… घर से कचरा निकाल’ या भन्नाट गाण्याची स्टोरी?

0

MH13 NEWS NETWORK। सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात, घरोघरी, गल्लीबोळात, लहानथोरांच्या तोंडी एका गाण्याने चांगलेच बस्तान बसवले असून सकाळ झाली की हे गीत प्रत्येकाला एका सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत आहे. हे गीत कुठल्या सिनेमातले नसून स्वच्छतेचा संदेश देणारे ‘देख-देख-देख तू यहां वहां न फेंक, देख-देख-देख तू यहां वहां न फेंक, देख फैलेगी बीमारी होगा सब का बुरा हाल… तो का करे भैया? गाड़ीवाला आया घर से कचरा निकाल, गाड़ीवाला आया घर से कचरा निकाल…’ हे आहे

या गाण्याच्या लयीवर लहान थोर सगळेच सकाळी सकाळी कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीवाल्यांकडे प्रसन्न चेहऱ्याने कचरा सुपुर्द करत असल्याचे दिसत आहे. सध्या या गाण्याची लोकप्रियता इतकी तुफान आहे की, या गाण्यावर युट्यूबर्सनी डीजे रिमिक्स देखील बनवले आहेत. अनेक युट्यूब चॅनेलस वरून कोट्यावधी लोकांनी हे गाणे ऐकले आहे. युट्यूबच्या माध्यमातून देशासह विदेशातही या गाण्याने आपली क्रेझ निर्माण केल्याचे दिसत आहे.

गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल हे गाणे आले कुठून?

  • खरेतर हे गाणे २ वर्षापूर्वी मध्यप्रदेशातील एका शिक्षकाने लिहिले असून मोदींच्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेत त्यांनी या गाण्याची निर्मिती केल्याचे ते सांगतात. श्याम बैरागी असे या शिक्षकाचे नाव असून ते मंडला शहरात राहतात. श्याम यांना गाणी लिहिण्याची आवड असल्याने मंडला नगरपरिषदेच्या अध्यक्षांनी स्वच्छतेचा संदेश देणारे गाणे लिहिण्याविषयी श्याम यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी हे गाणे लिहिले असून सुरवातीला हे गाणे मंडला नगरपरिषदेच्या परिसरात कचरा उचलणाऱ्या घंटागाडींवर ऐकवण्यात येऊ लागले. काही दिवसातच लोकांच्या तोंडी हे गाणे रूळल्याने मध्यप्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्येही महानगरपालिका, नगरपरिषदांकडून या गाण्याचा वापर सुरू झाला. आणि बघता बघता हे गाणे देशाच्या विविध राज्यांच्या सिमा ओलांडून प्रत्येक भारतीयांच्या कानावर पडू लागले. हे गाणे सर्वच नगरपरिषदा, महानगरपालिका, जिल्हापरिषदा यांच्याकडून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सध्या वापरले जात आहे.  

सामाजिक संदेश देणाऱ्या गीताने सर्वांच्याच मनावर गारूड केल्याचं दिसून येत असून मराठी मध्येही अशाप्रकारे स्वच्छतेचा संदेश देणारे “ओला कचरा, सुका कचरा…” हे गीत देखील लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. सध्या याच गाण्यांच्या लयीवर पुणे महानगर पलिकेतील सफाई कामगार महादेव जाधव यांनीही स्वच्छतेविषयी जागृती करण्याचा नवा मार्ग शोधून काढला असून त्यांनीही या गाण्यांमध्ये आपल्या शब्दांची भर घालत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचं काम सुरू केलय. त्याचं हे गाणंही सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

याबाबत महादेव जाधव यांनी  ‘मला गाणी गाण्यास कोणीही सांगितलं नाही, मात्र असं केल्यानं लोकांपर्यंत माझा स्वच्छता संदेश खूप चांगल्या प्रकारे पोहोचतो. गेल्या २५ वर्षांपासून मी काम करत आहे. आता बदल होत आहेत. किमान ६० टक्के लोक नियम पाळत आहेत., असं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here