स्वान आर्ट अकॅडमी मार्फत ड्रॉइंग, क्ले कार्यशाळेचे मोफत आयोजन !
सोलापूर येथील सोना माता प्रशाला आणि व्हॅलेंटाईन स्कूलमधे सलग दोन दिवस चित्र-क्ले या दोन्ही कलांचा अविष्कार सोहळा पार पडला. यामध्ये मुलांनी विविध विषयांवरील चित्र निर्मितीचा आनंद लुटला. विविध कला अविष्कारातून स्वतःचा शोध घेताना या शाळेतील शिक्षकांसहित सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. क्लेची हाताळणी करताना त्या माध्यमांचा अभ्यास करून विविध पाने फुले प्राणी इत्यादींची निर्मिती करून त्याला ऑडिओ व्हिज्युअल परिणाम देऊन चलचित्र निर्मितीचा अनोखा प्रयोग, ‘स्वान’ संस्थेच्या अध्यक्षा कु. अपूर्वा शहाणे यांनी प्रोजेक्टर द्वारे प्रदर्शित केला. अगदी एका तासापूर्वी केलेल्या आपल्या कामाचे असे दृक श्राव्य सादरीकरण आणि तेही इतक्या आकर्षक पद्धतीने होवू शकते, हे पाहून मुलांचे चेहरे आश्चर्य आणि आनंदाने फुलून गेले.
सुरुवातीला संस्थेची कार्यशैली, उद्दिष्टे आणि अपेक्षित परिणाम या विषयी श्री. उन्मेष शहाणे यांनी थोडक्यात विषद केली.
चित्रकलेतून आपली संस्कृती जपतानाच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर होणारा परिणाम ही तितकाच महत्वाचा आहे हे या कार्यशाळेतून लक्षात आल्याचे सोना माता प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा झाडे यांनी सांगितले.
नियमित असलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुलांना काहीतरी वेगळे आणि विचार करायला भाग पाडणारे प्रात्यक्षिक करायला मिळाल्याचा आनंद काही वेगळाच होता अशी प्रतिक्रिया व्हॅलेंटाईन स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्याणी जी. एच. यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी काही विद्यार्थ्यांची मनोगते अतिशय दखल घेण्यासारखी आणि कार्यशाळेची यशस्विता दर्शविणारी होती.
सेटलमेंट भागातील मराठी माध्यमातील सोना माता प्रशाला आणि पूर्व भागातील व्ह्यालेंटाईन ही संपूर्ण इंग्लिश मिडीयम स्कूल अशा दोन्ही प्रकारच्या शाळेतील सलग दोन दिवसांचे दोन वेगवेगळे अनुभव आम्हालाही खूप प्रेरणा देणारे ठरले अशी भावना स्वान संस्थेच्या संचालिका सौ. सुवर्णा शहाणे यांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेतील मुलांचा कला अविष्कार पाहून उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद आणि विद्यार्थी भारावून गेले तसेच, यापुढेही अशाच प्रकारच्या कार्यशाळेचे नियमित आयोजन व्हावे अशी इच्छा, दोन्ही संस्थेच्या मुख्याधिपिका यांनी व्यक्त केली.
ही कार्यशाळेसाठी सौ. दर्शना धुमाळ, सौ. मनीषा पवार सौ. वैशाली दमकोंडवार कु. अपूर्वा शहाणे या चित्रकारांचे मार्गदर्शन लाभले.