88670 क्विंटल खते, 2784 क्विंटल बियाणे वितरीत
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बिराजदार यांची माहिती
सोलापूर, दि. 21:- जिल्ह्यातील 7965 शेतकरी गटांमार्फत 88670 क्विंटल खते आणि 2784 क्विंटल बियाण्यांचे शेतकऱ्यांच्या बांधावर वितरण करण्यात आले. 36324 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून यापुढेही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते वितरित केली जातील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी आज सांगितले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या बांधावर खते आणि बियाणे उपलब्ध करून द्या अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी नियोजन केले असून त्यानुसार खते आणि बियाणे वितरणास सुरू केले आहे. त्यानुसार आत्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या 7965 शेतकरी गटांची मदत घेण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे आणि खतांसाठी प्रवास करावा लागणार लागला नाही, असे बिराजदार यांनी सांगितले.
खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा आहे. गेल्या तीन वर्षात सरासरी सर्व पिकांसाठी 31 हजार क्विंटल बियाणे वापरले गेले आहे. यावर्षी आजपर्यंत महाबीज मार्फत 4426 क्विंटल आणि खासगी कंपन्यांमार्फत 14062 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे, असे श्री. बिराजदार यांनी सांगितले.
खताचा पुरवठा मागणीच्या 96 टक्के झाला आहे. युरिया 235410, डीएपी 105700 क्विंटल, म्युरेट ऑफ पोटॅश 135800 क्विंटल, एनपीके -129800 क्विंटल तर सिंगल सुपर फॉस्फेट 61500 क्विंटल खते उपलब्ध झाली आहेत, असे श्री. बिराजदार यांनी सांगितले. कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता तपासणीसाठी 34 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक काम करीत आहेत. सनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुका स्तरावर अकरा भरारी पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती श्री. बिराजदार यांनी दिली.