जगदंबेच्या जयघोषात निघाली श्री दुर्गामाता दौड

श्री शिवप्रतिष्ठानचा उपक्रम; फेटेधारी युवकांचा मोठा सहभाग

0

(वेब/टीम)

‘भारतमाता दुर्गामाता एक है एक है’, ‘देशासाठी जगायचं रं शिवबानं सांगावा धाडलाय रं’, ‘जय भवानी जय शिवराय’ अशा घोषणा, गीते म्हणत गुरूवारी शहरातून शेकडो युवक धावले. निमित्त होते श्री शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गामाता दौडीचे.

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानतर्फे नवरात्रीनिमित्त गुरूवर्य श्री संभाजीराव भिडे गुरूजी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक गावात घटस्थापना ते विजयादशमी दररोज श्री दुर्गामाता दौड काढण्यात येते. यात गुरूवारी सोलापूरातही श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. सगळ्यात समोर भगवा ध्वज होता. त्यामागे शस्त्रपथक, त्यानंतर अब्दागीर हाती धरलेले धारकरी अन् शेकडो युवक – युवती होत्या. श्री दुर्गामाता दौडीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने भगवा फेटा धारण केल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन नगरसेवक सुनिल कामाठी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रेरणा मंत्राने श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ झाला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही दौड पत्रा तालीम, सळई मारूती मंदिर, चौपाड, दत्त चौक, श्री शुभराय मठ, लक्ष्मी मंडई, झुंजे बोळ, शुक्रवार पेठ, माणिक चौक, जुने विठ्ठल मंदिर, टिळक चौक, मधला मारूती, मंगळवार पेठ पोलिस चौकी, बलिदान चौक, विश्रांती चौकमार्गे श्री रूपाभवानी मंदिरात पोहचली. वाटेत ज्ञानेश्‍वर नवरात्र महोत्सव मंडळ, वानकर, कुलकर्णी, शिंदे, धाराशिवकर, देवधर, अंजिखाने, गवसने आदी परिवारांनी रांगोळ्या घालून, फटाक्यांची आतिषबाजी करीत पुष्पवृष्टी केली. भगव्या ध्वजाचे पूजन घरोघरी करण्यात आले. श्रद्धानंद समाज मानाचा श्री आजोबा गणपती ट्रस्टतर्फे श्री आजोबा गणपती मंदिरासमोर भगव्या ध्वजाचे पूजन झाले. त्याचबरोबर छावा ग्रुपकडूनही रांगोळ्यांच्या पायघड्या घालून ध्वजाचे स्वागत आणि पूजन करण्यात आले.

श्री दुर्गामाता दौड श्री रूपाभवानी मंदिरात पोहचल्यानंतर तेथे सामूहिक आरती करण्यात आली. ध्येयमंत्राने श्री दुर्गामाता दौडीचा समारोप झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here