‘संकटा’त संधी शोधू नका, मुख्यमंत्री ठाकरेंचा ‘यांना’ इशारा

0

लाईव्ह प्रसारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई दि. 24: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुणीही काळाबाजार करू नये, साठा करू नये, या संकटाचा संधी म्हणून उपयोग करू नये असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच आज पोलिसांनी धाड टाकून मास्कच्या होत असलेला काळाबाजार उघडकीस आणला,  त्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले. भविष्यातही अशा प्रकारांवर याचप्रकारे कारवाई व्हावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

जगणे थांबवले नाहीजीवनशैली बदलली

आपल्याकडे राज्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याची वाहतूक आणि वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या सूचना आज पुन्हा दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी, शेतमजूर यांना शेतात जाण्यास, काम करण्यास मनाई नाही. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आपण थांबवलेली नाही. शेतमालाची वाहतूक करण्यास बंदी केलेली नाही. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ही उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर, कंपन्यांवर आपण बंदी घातलेली नाही. ज्या कंपन्या अशा प्रकारे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करतात त्यांनी आपल्या वाहनांवर कंपनीचे नाव, उत्पादन, कर्मचारी यांची माहिती देणारे ओळखपत्र लावावे, त्यांना वाहतुकीत कुठेही अडवले जाणार नाही हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपण जगणे थांबवले नाही तर जीवनशैली बदलली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

विषाणूला जिथे आहे तिथेच संपवायचे

पोलीस जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक रोखत आहेत, भाजी आणि दूध आणायलाही बाहेर जाऊ देत नाही अशा काही तक्रारी आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हे संकट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपण  जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. आतापर्यंत जिथे विषाणूचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो पोहोचू नये, म्हणून हा निर्णय घेतला आहे. विषाणूला आपल्याला आहे तिथेच पूर्ण शक्तीने संपवायचे आहे. आपण जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद केलेली नाही. खरेदीसाठी बाहेर पडणेही बंद केलेले नाही. परंतु प्रत्येकाने समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. कुणीही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडायचे आणि विनाकारण फिरत बसायचे असे करू नये, घरातच राहावे आणि सुरक्षित राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here