कोठे-सपाटे | ‘त्या’ निवडीस आव्हान देणारी याचिका रद्द ; वाचा सविस्तर…

0
  • नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या निवडीस आव्हान देणारी सपाटे यांची याचिका रद्द 
  • सोलापूर दिवाणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल 

सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2012 च्या निवडणुकीत देवेंद्र राजेश कोठे यांची झालेली निवड रद्द करण्याची ज्ञानेश्वर बबन सपाटे यांची याचिका वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्री. कृष्णराव के. पाटील यांनी फेटाळली आहे.


याची हकीगत अशी की, सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2012 च्या निवडणुकीत प्रभाग क्र. 12 मधून देवेंद्र राजेश कोठे हे निवडून आले होते. तथापि कोठे यांनी निवडणुकीत अवैध व बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप करून ज्ञानेश्वर सपाटे यांनी देवेंद्र कोठे यांची निवड रद्द करण्यासाठी सोलापूर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत कोठे यांच्याविरुद्धध ज्ञानेश्वर सपाटे, मनोहर सपाटे व अन्य साक्षीदारांनी साक्षी नोंदवल्या होत्या.

तथापि देवेंद्र कोठे यांचे वकील अरविंद अंदोरे यांनी न्यायालयास स्वतंत्र अर्ज देऊन कोठे यांनी त्यांचा नगरसेवक पदाचा कालावधी यशस्वीरित्या व कायदेशीरपणे पार केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन सपाटे यांची याचिकेतील मागणी व्यर्थ व निष्फळ झाल्याचा युक्तिवादही सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा देऊन केला. त्यासही सपाटे यांचे वकील पी.डी. कुलकर्णी यांनी विविध मुद्दे मांडून तीव्र आक्षेप घेतला. दोन्ही बाजू ऐकून न्यायाधीशांनी सपाटे यांच्या याचिकेचा मूळ हेतूच निष्फळ झाल्याचे नमूद करून याचिका रद्दबातल केली.


राजकीय क्षेत्रात गाजलेल्या या याचिकेत देवेंद्र कोठे यांच्यातर्फे अरविंद अंदोरे वकील, सपाटे यांच्यातर्फे पी. डी. कुलकर्णी वकील तर सोलापूर महानगरपालिकेतर्फे उमेश मराठे वकील यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here