कोरोना | मृतांच्या नातेवाईकांसाठी मदतनिधी ; असा करा अर्ज

0
corona update

Mh13news Network

कोविड – 19 आजाराने मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना शासनातर्फे 50,000/- रूपयांची मदत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रासह सेतू, ग्रामपंचायत येथून अर्ज करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पवार यांनी केले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार महाराष्ट्र राज्यात कोविड-१९ या आजाराने निधन झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास पन्नास हजार रूपये इतका मदतनिधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. निधी मिळण्यासाठी अनेकांनी राज्य शासनाने विकसित केलेल्या http://mahacovid19relief.in या वेब पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज केले आहे. मात्र काही अर्ज आवश्यक कागदपत्रे, व्यक्तीचा तपशील व्यवस्थित नसल्याने नाकारले गेले आहेत. आपला अर्ज नाकारू नये याकरीता अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन जोडणे गरजेचे आहे. अर्जदाराने आपण स्वत: ऑनलाईन अर्ज करावा. आपल्याला माहिती नसेल तर जवळच्या सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करावा.

  • अर्ज दाखल करताना घ्यावयाची काळजी –
  1.  अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक
  2.  अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील
  3.  मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील
  4.  मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र
  5.  इतर निकट नातेवाईकांचे ना-हरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र.

इत्यादी कागदपत्रे बंधनकारक आहेत.

  • अर्ज करतांना याकडे लक्ष द्या –

ज्या जिल्हयामध्ये कोविड-१९ ने मृत्यू झाला आहे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी मदतीचा अर्ज त्याच जिल्हयामध्ये (महानगरपालिका क्षेत्र / ग्रामीण क्षेत्र) करणे आवश्यक आहे. अर्ज दाखल करताना मयत व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवाल, मृत्यू दाखला ,अर्जदार यांचा आधार कार्ड व आधार लिंक असलेला बँकेचा तपशिल अचूक सादर करणे आवश्यक आहे. बँकेचा तपशिल सादर करताना पासबुक / रद्द केलेला धनादेश सादर करणे आवश्यक आहे. एका मयत व्यक्तींसाठी एकच अर्ज करावा. अर्ज नोंदणी करताना अर्जदार यांनी त्यांचे स्वत:कडे कार्यरत असलेला मोबाईल नंबर वापरूनच नोंदणी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here