जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध चार गुन्हे दाखल
सोलापूर : पोलिसांनी शहर परिसरात विविध ठिकाणी कारवाई करून जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात चार गुन्हे दाखल केले आहेत.
शेळगी येथे जुगार खेळताना गुन्हे शाखेचे कर्मचारी विद्यासागर मोहिते यांनी दोघांना पकडले. बुधवारी (ता. १८) संशयित अजिम कोंडाजी (वय ४०, रा. शेळगी) व सारंग अंकुश कसबे (रा. सोलापूर) यांना कल्याण नावाचा मटका खेळताना पोलिसांनी पकडले.
या प्रकरणी जोडभावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे शाखेचे कर्मचारी गणेश शिंदे यांनी विजयपूर नाका येथील पी. आर. पान शॉप दुकानाच्या बाजूस प्रशांत राजशेखर परीट (वय २४, रा. उद्धवनगर, सैफूल) व राहुल विलास जाधव (रा. सोलापूर) यांना जुगार खेळताना पकडले. त्यांच्याकडून ७०५ रुपये रोख रक्कम व साहित्य जप्त केले.
गुन्हे शाखेचे कर्मचारी भारत पाटील यांनी मल्लिकार्जुन नगरात जुगार खेळताना संशयितांना पकडून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संशयित नवीनकुमार पाटील (वय ४८, समर्थनगर) व राकेश कोरे (रा. सोलापूर) हे दोघे कल्याण नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्याकडून ५७५ रुपये व साहित्य जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेचे कर्मचारी तात्यासाहेब पाटील यांनी रविवार पेठेत कारवाई करून संशयित प्रशांत चारमगोळ (वय ३०, रा. उत्तर कसबा) व राकेश कोरे (रा. सोलापूर) यांच्याकडून ५९५ रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.