Breaking : देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन

0

by-MH13News,network

नवी दिल्ली –  देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते अरुण जेटली यांचे आज शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं दि .९ ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आले होते. अभ्यासू नेते म्हणून भाजपच्या गोटात ते प्रसिद्ध होते.

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा अल्प परिचय 

प्रसिद्ध वकील असणारे महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२ मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ’ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३ मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७ या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. साल २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेतेपदी नियुक्ती झाली होती. १९६०-६९ दरम्यान सेंट झेवियर्स स्कूल, नवी दिल्ली येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. १९७३ मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, कॉमर्समधून वाणिज्य विषयात पदवी संपादन केली. १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायदा पदवी पास केली. सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) विद्यार्थी कार्यकर्ते होते.

१९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. १९८२ साली त्यांनी संगीता जेटली यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुले आहेत. मुलाचं नाव रोहन तर मुलीचं नाव सोनाली आहे. १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली. जानेवारी १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त केले.

जेटली १९९१ पासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.१९९९ च्या लोकसभा निवडणुकींच्या काळात ते भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये जेटली यांनी ‘सूचना और प्रसारण राज्य मंत्रीपदी नियुक्ती झाली.मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here