शिवस्मारकतर्फे १५ मार्च रोजी भजन स्पर्धा
पुरुष आणि महिला भजनी मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन
सोलापूर : प्रतिनिधी
श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे (शिवस्मारक) बुधवार, १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता शिवस्मारक सभागृह येथे भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुरुष आणि महिला अशा दोन गटांत या स्पर्धा होणार आहेत. दोन्ही गटांना स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत. यात प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक १ हजार रूपये, उत्कृष्ट वादक १ हजार रुपये देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर प्रत्येक मंडळास स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व सहभागी झालेल्या भजनी मंडळाच्या प्रत्येक सदस्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. गेल्या ५ वर्षांपासून ही भजन स्पर्धा घेण्यात येत असून १५५ मंडळातून १५५० सदस्यांनी सहभाग घेतला आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते बुधवारी (दि.१५) सकाळी १० वाजता होणार आहे.
प्रत्येक मंडळात वादकासह कमीत कमी ८ आणि जास्तीत जास्त १२ सदस्य असावेत. वादन साहित्य मंडळाने स्वतः आणायचे आहेत. प्रत्येक मंडळाला १५ मिनिटांचा वेळ देण्यात येणार असून यात मंडळांनी १ गवळण आणि २ अभंग म्हणता येतील.
भजनी मंडळाची नोंदणी विनामूल्य असून नोंदणी सोमवार (दि.१३) दुपारी चार वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अधिकाधिक भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा व अधिक माहितीसाठी ९८२२४९८३७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी केले.
या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने, खजिनदार व स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी, संचालक प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर आदी उपस्थित होते.