स्टार महोत्सवाच्या माध्यमातून बँक ऑफ इंडियाकडून होणार कर्जाचे वितरण – अजय कडू

0

सोलापूर, (प्रतिनिधी):- समाजातील प्रत्येक घटकापर्यत पोहोचण्याच्या दृष्टीने हर घर दस्तक च्या माध्यमातून बँकेच्या सर्व योजना पोहोचवून ग्रामीण भागातील महिला, शेतकरी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना कर्ज वितरण करण्यात येणार आहे. सोमवार दि. 23 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वा. हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये स्टार महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय व्यवस्थापक शैलेशचंद्र ओझा, संतोष सोनवणे, सचिन कुमार, आनंद माने आदी उपस्थित होते.
स्टार महोत्सवाच्या माध्यमातून सोलापूर विभागातील सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील ग्राहकांचा मेळावा होणार आहे. या स्टार महोत्सवाच्या माध्यमातून विशेष अभियान सुरू करण्यात आले असून त्यामध्ये स्वयंसहाय्यता गट, व्यवसायिक, उद्योजक, महिला, शेतकरी, लघू उद्योजक, मुद्रा, एमएसएमई या योजनामधून कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडीट कार्ड आणि फूड प्रोसेसिंग संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. कर्जाची परतफेड न करू शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना बँक इंडियाच्या वतीने राबवण्यात येत आहे. शेतकरी, महिला यांना सक्षम करण्यासाठी बँक ऑफ इंडिया कटीबध्द असल्याचेही यावेळी कडू यांनी सांगितले.
स्टार महोत्सव हा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये सोमवार दि. 23 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यत हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमासाठी बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक रमेशचंद्र ठाकूर, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here