होळीनिमित्त शहरात वृक्षतोड केल्यास होणार कारवाई — महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले
सोलापूर — होळी आणि रंगपंचमी या दोन्ही सणांना भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्व असून या दिवशी प्रत्येक जण आपल्या जीवनातील ताणतणाव विसरून एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करताना आढळतात. महाराष्ट्र सह सोलापूर शहरामध्ये होळीचा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या होळीच्या सणानिमित्त अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून पर्यावरणाला हानी पोहोचवण्यात येते. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्षतोड करू नये आणि अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांना दंड तसेच कायद्याने शिक्षा होऊ शकते.असा इशारा सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला.
.अनाधिकृतपणे वृक्षतोड करणे हा गुन्हा आहे. यामुळे होळीनिमित्त कोणत्याही प्रकारचे वृक्षतोड करू नये वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास सतर्क नागरिकांनी स्वतःच्या विभागातील महानगरपालिका कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात सजारा करण्यात येणाऱ्या धुलीवंदन,रंगपंचमी दिवशी केमिकलयुक्त रंगाचा वापर न करता सर्वांनी पर्यावरण पूरक रंगाचा वापर करावा असे आवाहान महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिले. सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या महापालिकेच्या वतीने शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
वृक्षतोड केल्यास शिक्षा
महाराष्ट्र (नागरिक क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम 1975 च्या तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही झाड तोडणे तोडण्यास कारणीभूत होणे हा कलम 21 अनन्वये अपराध आहे.अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांना दंड तसेच कायद्याने शिक्षा होऊ शकते.