‘सोलापुरी भाऊ’ लागला धक्क्याला ; ‘एक्साईज’चे ढाब्यावरचे धाडसत्र जोमात

0

2 ढाब्यांवर धाडी
होटेलचालकांसह 10 मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल
न्यायालयाने ठोठावला 70 हजारांचा दंड
होटेल ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरुच असून बुधवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर -पुणे हायवे व विजापूर रोडवरील ढाब्यांवर धाडी टाकून ढाबा चालकांसह त्या ठिकाणी दारु पितांना आढळून आलेल्या 10 मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 21 डिसेंबर शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक पुष्पराज देशमुख यांच्या पथकाने सोलापूर-पुणे हायवेवरील बाळे परिसरातील होटेल सोलापुरी भाऊ या ढाब्यावर धाड टाकून होटेल चालक महंमद फिरोज सिद्दीकी, वय 38 वर्षे याच्यासह मद्यपी ग्राहक रवि पाटील, अक्षय इराबट्टी, प्रज्वल इंदापुरकर, आकाश शिरसाट व अक्षय काळेकर यांना अटक केली. तसेच एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने विजापूर रोडवरील सैफुल परिसरातील होटेल जगदंबा येथे धाड टाकून होटेल चालक दत्तात्रय कुंडलिक झोडे, वय 44 वर्षे व त्याठिकाणी दारु पित बसलेले ग्राहक राजेशकुमार गौतम, विकास गौतम, दीपू गौतम, गोलू रावत व सुरेंद्र यादव अशा 5 मद्यपींना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (अ) (ब) व 84 नुसार गुन्हा दाखल करुन दोन्ही गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी 22 डिसेंबर रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले असता श्रीमती नम्रता बिरादार, न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय, सोलापूर यांनी तात्काळ निकाल देत ढाबाचालकाला प्रत्येकी रू. 25 हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. दोन हजार असा एकूण 70 हजारांचा दंड ठोठावला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक पुष्पराज देशमुख , उषाकिरण मिसाळ, जवान शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.
*आवाहन*
नाताळ सण व नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून 6 पथके नेमण्यात आली असून ढाबा / होटेलच्या तपासण्या करण्यात येत असून ढाब्यांवर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे हे कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील.

ज्या होटेल्सना न्यू ईअर पार्ट्यांचे आयोजन करावयाचे आहे त्यांनी त्याठिकाणी मद्याचे वितरण करण्यासाठी या विभागाकडून रीतसर वनडे क्लब लायसंस घ्यावे, अन्यथा अशा होटेल्सचे मालक व आयोजकांविरुद्धही कारवाई करण्यात येईल

नितिन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here