मोठी बातमी | प्रशांत किशोर यांची ‘राजनीती’ सोडण्याची घोषणा

0

Mh13news Network

भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्यास निवडणूक रणनीतीकार म्हणून करत असलेलं काम थांबवेन, अशी घोषणा करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच धक्का दिला आहे. बंगालमध्ये भाजपला १०० पेक्षा कमी जागा मिळताना दिसत असताना, किशोर यांचा अंदाज खरा ठरत असताना, त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून करत असलेलं काम थांबवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

‘निवडणूक रणनीतीकार म्हणून मी बरंच काम केलं आहे. ८ ते ९ वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करत आहे. मला आता आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं आहे आणि ते मी करेन. मी हे काम आयुष्यभर करणार नाही असं मी आधी अनेकदा म्हटलं आहे. आयपॅकमध्ये (इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी) माझे अनेक चांगले सहकारी आहेत. ते उत्तम काम करत आहेत. त्यांनी त्यांचं काम असंच सुरू ठेवावं,’ असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

तुम्ही राजकारणात जाणार का, असा सवाल किशोर यांना विचारण्यात आला. त्यावर किशोर यांनी उत्तर देणं टाळलं. राजकारणात जातोय किंवा जात नाही याबद्दल मी काहीच बोलत नाही. पण आता करत असलेलं काम थांबवत आहे. आयपॅकमधील माझ्या सहकाऱ्यांनी आता आयपॅकची जबाबदारी घ्यावी. मी आता ब्रेक घेत आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे’, असं किशोर यांनी सांगितलं.

बंगाल निवडणूक, भाजपबद्दल काय म्हणाले होते प्रशांत किशोर ?

बंगालमध्ये भाजपला १०० हून अधिक जागा मिळाल्यास मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणं बंद करेल आणि दुसरे काहीतरी काम सुरू करेल, असं किशोर म्हणाले होते. बंगालमध्ये भाजपनं १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही मला दुसरे काहीतरी काम करताना बघाल. पण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करताना मी तुम्हाला कधीही दिसणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here