पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक :कमळ फुलले, भाजपचे समाधान अवताडे विजयी

0

Mh13news Network

राज्याचे लक्ष लागू राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. आवताडे, भालके यांच्यासह १९ उमेदवार रिंगणात होते. पण भालके व आवताडे यांच्यातच मुख्य लढत होती.

आमदार भारत भालके यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक झाली. वास्तविक पंढरपूर – मंगळवेढ्याची निवडणूक असली तरी राज्यातील महाविकास आघाडी व भाजप महायुतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने संचारबंदी असूनही राज्यपातळीवरच्या नेतेमंडळींनी प्रचाराचे रान उठवल्याने पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ आरोप प्रत्यारोपांनी ढवळून निघाला. विरोधकांच्या टोलेबाजीने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा विषय राज्यपातळीवर गेला.

19 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आवताडे यांनी 1 हजार मतांची आघाडी घेतली. त्यांचा स्वतःच्याच असलेल्या मंगळवेढा या भागाची मतमोजणी बाकी होती. तेव्हाच आवताडे यांचा विजय होणार हे निश्चित झाले होते.मंगळवेढ्याची मतमोजणी 20 ते 38 या फेरींमध्ये झाली. तो भाग आवताडेंचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे 19 व्या फेरीनंतरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं. आवताडे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर तालुक्यात भारत भालके यांना मागच्या निवडणुकीत 6000 मतांची आघाडी मिळाली होती. पण भारतनानांचे सुपुत्र भगीरथ यांना नागरिकांनी तो प्रतिसाद दिला नसल्याचं पाहायला मिळाले. कारण पंढरपूर तालुक्यात भगीरथ यांना कमी मतदान मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here