‘सृजनरंग’ या नियतकालिक स्पर्धेत प्रा. यशपाल खेडकर यांनी स्विकारला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

0

Mh13News Network

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या ‘सृजनरंग’ या नियतकालिक स्पर्धा २०१९-२०’ मध्ये विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांमधून गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इस्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘एक्सप्लोरर’ या वार्षिक नियतकालिकाला ‘प्रथम क्रमांक’ मिळाल्याचे या अगोदर घोषित केले होते. परंतु कोरोना कालावधी सुरु असल्याने या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयोजित केले गेले नव्हते. नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या प्रांगणात पारितोषक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल (भापोसे) यांच्या हस्ते स्वेरीचे नियतकालिक ‘एक्सप्लोरर २०२०’ ला प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. स्वेरीच्या वतीने या नियतकालिकाचे संपादक प्रा. यशपाल खेडकर यांनी तो पुरस्कार स्वीकारला.

महाराष्ट्राच्या व सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वेरीने आपले स्थान कायम राखल्याचे वारंवार दिसून येते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या ‘सृजनरंग नियतकालिक २०१९-२०’ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे तंत्रशिक्षण घेणाऱ्या येथील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रा. यशपाल खेडकर यांनी संपादित केलेल्या ‘एक्सप्लोरर’ या नियतकालिकात साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील विविध घडामोडींचा आढावा घेतला आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध प्रकारचे साहित्य या नियतकालिकात आठ विभागात असून चित्रकला, विज्ञान व तंत्रज्ञान, समीक्षा, पत्रलेखन, कथा, कविता, लेख, मुलाखत, शैक्षणिक लेख बरोबर इतर आवश्यक घडामोडींचा उहापोह तसेच गतवर्षीच्या विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील, गेट परीक्षेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना छायाचित्रासह स्थान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची प्लेसमेंटची आकडेवारी, संशोधन, महाविद्यालयास मिळालेली मानांकने, महत्वाचे कार्यक्रम यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, प्रवेश प्रक्रिया व प्रसिद्धी विभागाचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. यशपाल खेडकर यांनी संपादित केलेले ‘एक्सप्लोरर’ हे नियतकालिक एकूण तीनशे दहा पानी आहे. विद्यार्थी संपादक श्रद्धा रेपाळ, विद्यार्थिनी सहसंपादक गौरी पवार, विद्यार्थी सहसंपादक ज्ञानेश्वर गोयकर तसेच विविध विभागामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, समीक्षा, पत्रलेखन, मल्टीलॅंग्वेज, कलादर्पण अशा विविध विभागांनी ‘एक्सप्लोरर’ चे अंतरंग खुलले असून यासाठी प्रा.प्रवीण मोरे, प्रा.स्नेहा कदम, प्रा.डी. टी. काशीद, प्रा. महेश यड्रामी यांच्यासह इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे यामध्ये विविध ग्रामीण कथा, निरक्षरांचे मनोगत आणि समाजसेविका सिंधुताई सपकाळ या सारख्या महत्वाच्या लेखांनी या नियतकालिकाचे महत्व वाढले आहे. तसेच या नियतकालिकात खास समीक्षा आणि पत्रलेखन याही विभागांचा समावेश केला गेलेला आहे. एकूणच सर्व अंगानी सजलेले हे नियतकालिक असल्यामुळे परीक्षक व निरीक्षकांच्या दृष्टीने स्वेरीचे ‘एक्सप्लोरर’ सर्वाधिक परिपूर्ण असल्याचे जाणवले म्हणून स्वेरीच्या नियतकालिकाला प्रथम क्रमांकाने गौरविले गेले आहे.

स्वेरीच्या या नियतकालीकाला प्रथम क्रमांक मिळाल्याचे पत्र सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.वसंत कोरे यांच्या सहीने यापूर्वीच प्राप्त झाले होते. या कार्यक्रमात नियतकालिक स्पर्धेचे सांघिक पारितोषिक वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. यावेळी. प्र-कुलगुरू डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा, सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. एस.के. पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे ‘एक्सप्लोरर’ च्या संपादकीय मंडळाचे संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी प्रा. यशपाल खेडकर, नियतकालिकाची सर्व संपादक मंडळे व चमूचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here