आग्र्यातून सुटका हा शिवछत्रपतींच्या आयुष्यातील सर्वोच्च रोमांचकारी क्षण :शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे

श्री शिवछत्रपती उत्तर दिग्विजय मोहीमेचे सोलापूरकरांकडून जोरदार स्वागत

0
9

By -एमएच13 न्यूज वेब/टीम

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संकटांचे अनेक प्रसंग आले. त्यावर त्यांनी मातही केली. परंतु आग्र्यातून सुटका हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च रोमांचकारी क्षण होता असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही असे मत शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी मांडले.

श्री शिवछत्रपती राजकीय उत्तर दिग्विजय मोहीम सोमवारी सोलापूरात आली. या मोहिमेचे सोलापूरकरांनी जोरदार स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील सुटकेस ३५१ वर्षे आणि श्री गुरूनानकदेवजी यांच्या जन्मास ५५० वर्षे झाल्याबद्दल ही मोहीम देशभरातील विविध शहरांतून काढण्यात येणारी मोहीम सोमवारी सोलापूरात आली.

प्रारंभी भुईकोट किल्ल्यातील आखाड्याच्या प्रवेशद्वारावर मोहिमेचे स्वागत महापौर शोभा बनशेट्टी यांनी औक्षण करून केले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री गुरुनानकदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी व्यासपीठावर मोहिमेचे प्रमुख डॉ. संदीप महिंद गुरुजी, महापौर शोभा बनशेट्टी, जेष्ठ इतिहास संशोधक आनंद कुंभार, डॉ. शिवरत्न शेटे, हरीश कुकरेजा, प्रताप चव्हाण, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक भारतसिंह बडूरवाले, महेश धाराशिवकर, मोहीम सेनापती अमित बडदे, ध्वजसरसेनापती योगेश शिंदे, राजेश निलगे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. शेटे म्हणाले, शत्रूला गाफील ठेऊन युद्ध जिंकण्याच्या गनिमी काव्याचे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांना अवगत होते. आग्र्यात नजरकैदेत असताना तेथून आपल्या सर्व मावळ्यांना सुखरूप महाराष्ट्र्रात पाठवून मगच त्यांनी आग्र्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच त्यांचा उल्लेख इतिहासात प्रजाहितदक्ष राजा असा केला जातो असेही डॉ. शेटे म्हणाले. राजगडावरून आग्र्याला जायला शिवछत्रपतींना ६६ दिवस लागले होते. परंतु आग्र्यातून अवघ्या २५ दिवसांत ते अखंड घोडदौड करून राजगडावर सुखरूप परतले. ही इतकी मोठी घोडदौड इतिहासातील एकमेव असल्याचेही डॉ. शेटे म्हणाले.

या मोहिमेत १४ राज्ये, ९१ जिल्हे, २२ तीर्थक्षेत्रे, ५७ किल्ले, १०३ सभा होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here