मागणी आल्यास २ दिवसात टँकर सुरु करा : मुख्यमंत्री

0
7

By-MH13NEWS,वेबटीम

मुंबई, दि. १० : राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदार आणि प्रांतअधिकारी यांना देण्यात आले आहेत. एखाद्या गावाकडून टँकरची मागणी आल्यास आवश्यकतेनुसार प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात यावी. तसेच संबंधित गावाला दोन दिवसात टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज ‘ऑडीओ ब्रीज सिस्टम’द्वारे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ४० सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाय योजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी,पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आदींचाही सहभाग होता.

मुख्यमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या संवादसत्रात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध भागातील सरपंचांनी सहभाग घेतला. सरपंचांनी गावातील पाणीटंचाई,चाऱ्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न अशा विविध समस्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या. त्याची तातडीने दखल घेऊन सरपंचांनी मांडलेल्या प्रश्नांवर गतीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपणास सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विविध अधिकाऱ्यांना दिल्या. या संवादसत्रात सुहास पाटील, तानाजी मोरे, उर्मिला शिंदे, काशिनाथ काकडे,कविता गवळी, महेंद्र पानसरे,विजयलक्ष्मी व्हनमाने, जैतुनबी पटेल, स्वाती जमदाडे, कय्युम आत्तार, सुरेखा चोरगे, अंकुश गौड,नितीन माळी, सुनंदा माने, शशिकला बाबर, विमल चव्हाण आदी सरपंचांशी थेट संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी दुष्काळसंदर्भातील समस्या जाणून घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here