अमेरिकेसह 15 देशातील तज्ञांचे शोधनिबंध होणार सादर

सोलापूर विद्यापीठात या महिन्यात जागतिक परिषद

0
7

(वेब/टीम)
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर,  साउथ डाकोटा विद्यापीठ, अमेरिका आणि इवोरा विद्यापीठ, पोर्तुगाल यांच्या संयुक्त विद्यमाने  21 व 22 डिसेंबर 2018 रोजी सोलापूर विद्यापीठात रिसेंट ट्रेंडस इन इमेज प्रोसेसिंग अँड पॅटर्न रिकग्नेशन या विषयावर जागतिक परिषदेचे आयोजन करण्याात आले आहे. या परिषदेत भारत, अमेरिकेसह विविध 15 देशातील तज्ञ सहभागी होऊन शोधनिबंध सादर करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

या जागतिक परिषदेसाठी मागील वर्षभरापासून संगणकशास्त्र संकुलातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांकडून तयारी सुरू आहे. या जागतिक परिषदेचे मुख्य समन्वयक म्हणून प्रा. डॉ. आर. एस. हेगडी हे काम पाहत आहेत. त्यांना पोर्तुगालच्या डॉ. तेरेसा जॉनकेलविस आणि अमेरिकेचे डॉ. केे.सी. संतोष हे साहाय्य करीत आहेत.

या परिषदेत शोधनिबंध सादर करण्यासाठी विविध देशातून एकूण 340 तज्ञांनी आपले शोधनिबंध पाठवले होते. त्यातील निवडक 180 शोधनिबंध या परिषदेत सादर होणार आहेत. यातील काही शोधनिबंध स्प्रिंजरसारख्या जागतिक पातळीवरील जर्नलमध्ये प्रकाशित केली जाणार आहेत. भारत, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका, युरोप, कोरिया, थायलंड, आयर्लंड अशा विविध 15 देशातील तज्ञांचा यामध्ये सहभाग असल्याचे डॉ. हेगडी यांनी सांगितले.

या जागतिक परिषदेसाठी 20 डिसेंबर रोजी पूर्वपरिषद कार्यशाळा पार पडणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी अमेरिकेचे डॉ. समीर अंथानी यांचे मेडिकल इमेजिंग या विषयावर, शिकागो विद्यापीठातील डॉ. मोहन गुंडेटी यांचे अॅपलिकेशन ऑफ रोबोटिक्स इन पिडीएटरीक यूरोलॉजी सर्जरी या विषयावर तर माल्टा विद्यापीठ, माल्टा येथील डॉ. अर्नेस्ट कॅशिया यांचे इंटरनेट ऑफ थिंग्स या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. 22 डिसेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचे सिग्नल प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंग या विषयावर तर मुंबईचे डॉ. प्रवीण श्रीखंडे यांचे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

अशा या जागतिक परिषदेमुळे सोलापूर विद्यापीठाचे नाव जगभर पोहोचणार आहे. परिषदेच्या यशस्वीतेसाठी तिन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विकास विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, संगणक शास्त्र संकुलाचे संचालक व प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाची समितीही कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here