…तर अपक्ष लढणार..! भाजपच्या महिला महापौरांचा एल्गार

पालकमंत्र्यांना उमेदवारी दिल्यास विरोधात उभे ठाकणार

0
2609

महेश हणमे, 9890440480

मागील दोन वर्षांपासून ‘उत्तर’ मधून आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं सोलापूरच्या भाजपच्या महिला महापौर शोभा बनशेट्टी यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं होतं. विविध प्रसंगानुसार जाहीर कार्यक्रमातून आणि MH13 न्यूजशी बोलताना भावी आमदारकीचा मनोदय व्यक्त केला होता.पालकमंत्री देशमुख यांना ‘उत्तर’ विधानसभेसाठी भाजपची उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं.

आज सोमवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर त्यांनी पालकमंत्री देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला.

विद्यमान आमदार तथा पालकमंत्री विजय देशमुख यांनी सलग तीन वेळा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. विधानसभा 2014 मध्ये त्यांनी विक्रमी मते मिळवली होती. सध्याच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांनी लोकोपयोगी अपेक्षित कामे केली नाहीत.त्यामुळे यंदाच्या विधानसभेच्या टर्म ला पालकमंत्र्यांना उमेदवारी दिल्यास विरोधात निवडणूक लढवू असं सांगितलं.

उत्तर मतदारसंघातून अॅड. मिलिंद थोबडे हेही इच्छुक आहेत. दरम्यान,त्यांना उमेदवारी दिल्यास भाजपचे काम करू असे महापौर म्हणाल्या. पंधरा वर्षात पालकमंत्र्यांनी काहीच ठोस काम केले नाही. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये. पालकमंत्र्यांना सोडून इतर कोणालाही उमेदवारी द्यावी,आम्ही पक्षाचे काम करू. मात्र त्यांनाच उमेदवारी दिली तर, त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करू, असे सौ. बनशेट्टी म्हणाल्या.

स्नेह संबंध’ वाढण्यासाठी राजकीय वजन..
उत्तर विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री देशमुखांचा बालेकिल्ला समजला जातो. संयमी पण चाणाक्ष अशी त्यांची राजकीय प्रतिमा आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबतचे ‘स्नेहसंबंध’ सोलापूर पासून मुंबई पर्यंत आणि मनपा गार्डन ते कसब्यातील कट्ट्यावर प्रसिद्ध आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री देशमुख यांच्या उमेदवारीला ‘बाजारसमिती फॉर्म्युला’ लावला जाण्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी पालकमंत्री देशमुख राजकीय वजन वापरत असल्याचं बोललं जातंय.

सहकारमंत्री समर्थक…

महापौर बनशेट्टी या सहकारमंत्र्यांच्या कट्टर समर्थक आहेत.त्याचसोबत अक्कलकोट मधून त्यांना रसद मिळू शकते. त्यामुळे आजच्या अपक्ष उमेदवारीतून बंडाची घोषणा करण्यामागे पालकमंत्री व सहकारमंत्री ‘स्नेहसंबंध’ असल्याचं मत कट्टर भाजप समर्थक व्यक्त करत आहेत. यानिमित्ताने उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये नव्याने विविध चर्चेला सुरुवात झाल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here