खा. राजू शेट्टी यांच्याकडून आ. तानाजी सावंत यांची जाणीवपूर्वक बदनामी – वानकर

0
3

(वेब/टीम)

विनाअडथळा आणि विनाव्यत्यय सुरू असलेले तब्बल नऊ साखर कारखाने तसेच शिक्षणसंस्था, शिवजलक्रांतीच्या माध्यमातून शेकऱ्यांमध्ये आणलेली हरितक्रांती, सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनेकांचे उभे केलेले संसार असा सर्व सामाजिक कामांचा लेखाजोखा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील जनतेच्या हृदयात असताना खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा दिखावा करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा शिवसेना जाहीर निषेध करत आहे. खासदार शेट्टी यांनी सेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांची माफी मागावी अन्यथा त्याना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिला.
आमदार तानाजी सावंत यांच्याबद्धल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेच्यावतीने मोहोळ चौकात जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

जिल्हाप्रमुख वानकर म्हणाले, शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे खासदार राजू शेट्टी यांचे वक्तव्य त्यांच्या पदाला शोभणारे नाही. भैरवनाथ शुगर साखर कारखान्याने शेकऱ्यांच्या मनात मानाचे स्थान पटकावले असताना तसेच  शेतकरी सभासदांना मोफत साखर वाटून त्यांची दिवाळी गोड केली असतानासुद्धा खासदार राजू शेट्टी यांनी आमदार तानाजी सावंत यांच्याबाबत वक्तव्य करून प्रसिद्धीस्टंट केला आहे.खऱ्या अर्थाने अनेक साखर कारखाने चांगल्या पद्धतीने चालत असताना शेतकऱ्यांना पुढे करून खासदार शेट्टी आपली पोळी भाजून घेत आहेत. आमदार तानाजी सावंत यांनी केलेल्या कामापेक्षा एक टक्कातरी काम खासदार शेट्टी यांनी केले आहे काय ? शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करून कारखाने बंद करण्याचा उद्योग खासदार करत आहेत हे कारखानदारांना न कळण्याइतके कारखानदार खुळे नाहीत. सेनेचे उपनेते तानाजी सावंत यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल लाखो लोकांनी घेतली आहे. त्यांनी सुरू केलेले सर्व नऊ साखर कारखाने प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना न्याय देत असताना खासदार शेट्टी यांचे आमदार तानाजी सावंत यांच्याबद्धलचे वक्तव्य त्यांच्या अक्कल हुशारीची जाणीव करून देते. जिथे स्वार्थ तेथून काढता पाय घेत तडजोड करून अर्ध्या रात्री आंदोलन गुंडाळणारे खासदार राजू शेट्टी यांनी आमदार सावंत यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिला आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, तालुकाप्रमुख काकासाहेब देशमुख, दादासाहेब पवार, रणजीत गायकवाड, महेश देशमुख, सत्यवान देशमुख, अतुल गावडे, सिकंदर धोत्रे, पदाधिकारी सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here