‘मराठा’ जातप्रमाणपत्र मिळणार सेतू कार्यालयात

0
1

(वेब/टीम)

मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने आता जातीच्या आणि जात वैधता प्रमाणपत्राचा नमुना देखील शुक्रवारच्या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सेतू कार्यालये आणि महाऑनलाइन केंद्रांच्या माध्यमातून अन्य दाखल्याप्रमाणेच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या आरक्षणाद्वारे मिळणारे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी मराठा समाजातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला (एसबीसी) जातीचा दाखला अनिवार्य असणार आहे. हा दाखला मिळविण्यासाठीचा अर्जाचा नमुना आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या अर्जाचा नमूना सरकारने तयार केला असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णयाद्वारे तो उपलब्ध करून दिला आहे. सचिव दिनेश वाघमारे यांनी याबाबतचे आदेश सर्व विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांना निर्गमित केले आहेत.

हे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, सेतू आणि महाऑनलाइन केंद्रांच्या माध्यमातूनच या दाखल्यांचे वितरण करावे लागेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. परंतु त्यासाठी संबंधित सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करणे अनिवार्य ठरणार आहे. आरक्षणाचा लाभ दिला जाणाऱ्या प्रत्येक जातीसाठी विशिष्ठ क्रमांक देण्यात आला आहे. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी एक क्रमांक निश्चित करावा लागेल. तो क्रमांक सेतू तसेच महाऑनलाइन केंद्रांच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड केल्यानंतरच प्रत्यक्ष दाखले वितरण करणे शक्य होऊ शकेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here