मंगळवेढ्यात फुकटच्या जाहिरातबाजीला सार्वजनिक बांधकाम विभागाची मूकसंमती.!

0
92

by-दादासाहेब लवटे,MH13NEWS

पर्यावरण संरक्षणासाठी झाडे जगणे अतिशय महत्त्वाचे आहे, याचा जाहिरात बाजाराला विसर पडला असावा. कारण मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा जत राज्य महामार्गावरील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडांवर जाहिरातींचे फलक लावले जात आहेत. ही नित्याचीच बाब असली तरी त्यासाठी अनेक जण झाडांवर खिळे ठोकतात. झाडांवरील जाहिरातीमुळे पर्यावरणप्रेमीं मध्ये असंतोष उसळला आहे. “व्यावसायिकांना हे वागणं बरं नव्हं” असा प्रश्न उपस्थित करून संबंधित विभागांनी जाहिरातबाजांवर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडूण केली जात आहे.

याच बरोबर रस्त्याच्या कडेला उभी असलेली झाडे असो,अथवा शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी सुशोभिकरण आणि शीतल छाया मिळावी यासाठी झाडे लावण्यात येतात. काही झाडे पुरातन असल्याने त्यांचा आवाकाही मोठा असतो. मात्र या मोठ्या वृक्षांचा काही महाभागांनी जाहिरातीसाठी वापर सुरू केला आहे. बहुतांश झाडांना बॅनर,पोस्टर किंवा पाट्या लावण्यासाठी सर्रास खिळे मारले जात आहेत. झाडालाही वेदना होतात ही संवेदना प्रत्येकाच्या लक्षात आली पाहीजे व मनात रुजली पाहिजे. औषध,बी बियाणे कंपनी, शैक्षणिक संस्था, कापड दुकाने, विविध वाहनांच्या शोरुमसह अन्य दुकानांच्या नावाच्या जाहिराती कायमस्वरूपी झळकावण्यासाठी झाडांना खिळे ठोकून फलक लावण्यात आलेले आहेत. इतके होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग विविध गावांमधील ग्रामपंचायत प्रशासन गप्प कसे ? असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत. संबंधित विभागांनी या जाहिरात दारांवर लवकरात लवकर कारवाई करावी. जेणेकरून झाडांना मोकळा श्वास घेण्यासाठी मदत होईल.

 ट्री अॅक्टची अंमलबजावणी करा

राज्यात ट्री ऍक्ट १९७५ व महाराष्ट्र विरुपण प्रतिबंध अधिनियम १९९५ लागू आहे. या कायद्यानुसार झाडे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. झाडांना वैयक्तिक कारणासाठी हानी पोहचविणारे कृत्य हे बेकायदेशीर दखलपात्र आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करावी. अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. झाडांवर पोस्टर लावले गेले असल्यास त्याची तक्रार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यवस्था तसेच हेल्पलाइन सुरू करावी अशीही मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे .

मंगळवेढा-जत रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या झाडाला खिळे ठोकून लावलेला जाहिरातीचा फलक दिसत आहे. (छाया दादासाहेब लवटे, मंगळवेढा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here