सन्मान समाजरत्नांचा :अमर आणि लादेनचा..

संभाजी आरमारचा स्तुत्य उपक्रम

0
50

संभाजी आरमारला समाजासाठी झटणाऱ्या मुलखावेगळ्या व्यक्तिमत्वाचं नेहमीच कौतुक आणि आदर वाटत आलाय अशा रत्नांना खास दसरा दरबारामध्ये सन्मानित करण्याची संघटनेची परंपरा देखील आहे. यावर्षी अशीच दोन मुलखावेगळी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्यातील वेगळ्या गुणांनी, परिश्रमांनी स्वतःची ओळख तर बनविली अशांचा गौरव करण्याची संधी लाभली आहे. पहिलं व्यक्तिमत्व आहे अमर देवकर.

ज्यांनी कोणतीही अनुकूलता नसताना बार्शीसारख्या ग्रामीण भागातून कलेच्या प्रातांत सुरुवात करून थेट दिल्ली पर्यंत धडक मारली. म्होरक्या चित्रपटासारखी दर्जेदार कलाकृती निर्माण करून राष्ट्रीय पारितोषिकासोबतच सोलापूरकरांच्या काळजात देखील नाव कोरलं. आपल्या मातीला सन्मान प्राप्त करवून देणाऱ्या या अवलिया कलाकाराला सन्मानित करताना मनापासून आनंदच होणार आहे.

दुसरं अनोखं व्यक्तिमत्व आहे जहांगीर शेख उर्फ लादेन.

लादेन नावाने अवघ्या जगात तिरस्काराची जागा घेतली आहे मात्र सोलापुरात लादेन नावाने ओळखला जाणारा हा माणूस मात्र जाती-धर्माच्या पलीकडे पोचलेले उत्तुंग मानवतेचं प्रतीक आहे. आत्महत्या करून सडलेली, रेल्वे रुळावर तुकडे-तुकडे झालेली, पाण्यामध्ये पडून फुगलेली, तुकडे-तुकडे करून मारून टाकलेली एवढच काय तर मृत्यूनंतर पुरलेली आणि नंतर तपास कामासाठी काढताना कुजलेली मृतदेह, ज्या मृतदेहांना त्यांचे नातेवाईक, सख्खी मुलं देखील हात लावणार नाहीत अशा देहांना शेवटचे संस्कार करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून निरपेक्ष सेवा बजावणार हे व्यक्तिमत्व आहे. अशा मानवतेच्या सेवकाला सन्मानित करणं शिवरायांच्या विचारांची कास धरत असताना आपलं कर्तव्यच आहे.
मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराशेजारी, सोलापूर येथे हा हृदयस्पर्शी सोहळा संपन्न होणार आहे.अशी माहिती संभाजी आरमारच्या वतीने शिवाजी तात्या वाघमोडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here