मोदी, मोदी आणि फक्त मोदीजीच.! -देवेंद्र फडणवीस

0
2

मोदी, मोदी आणि फक्त मोदीजीच!
देश आणि देशातील जनता कुणाच्या बाजुने होती आणि आहे, हे आजच्या निकालांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. अकारण एक धुराळा या निवडणुकीत उडविला गेला, नाना शंका उपस्थित केल्या गेल्या. अतिशय हीन पातळीवर जाऊन प्रचार केला गेला. पण, देशाच्या मनात मोदी, मोदी आणि फक्त मोदीच होते, यावर या निकालांनी आज शिक्कामोर्तब केले आहे. हा विकासाचा, मोदीजींनी अवलंबविलेल्या लोककल्याणाच्या राजकारणाचा, पारदर्शी प्रशासनाचा, सकारात्मकतेचा आणि भारताच्या नवनिर्माणासाठी जनतेने दिलेला स्वच्छ, स्पष्ट, निर्मळ आणि तितकाच दणदणीत कौल आहे. मोदीजींच्या असामान्य नेतृत्त्वावर विश्वसनीयतेची मोहोर आज देशातील मतदारांनी उमटविली आहे.
केवळ निवडणूक प्रचार नव्हे, तर गेली 5 वर्षे स्वत:ला प्रधानसेवक या नात्याने देशसेवेत झोकून देणार्‍या मोदीजींनी एकही दिवस विश्रांती घेतली नाही. केलेल्या कामावर दृढ श्रद्धा आणि जनसामान्यांवर त्यांच्या असलेल्या विश्वासाचा हा विजय आहे. भारतीय जनता पार्टीला सलग दुसर्‍यांदा स्पष्ट, अभूतपूर्व आणि भक्कम जनादेश मिळवून देणार्‍या मोदीजींचा आज आम्हा सर्वांना अतिशय अभिमान आहे. आज इतिहास घडला आहे आणि या इतिहासपुरूषाने आपले नाव या इतिहासात कायमचे कोरले आहे. या विजयाबद्दल मी महाराष्ट्राच्या वतीने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीच्या रूपाने राष्ट्रसेवेत समर्पित आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व बुथप्रमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख, प्रभारी, आमदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमितभाई शाह यांनी अहोरात्र परिश्रम करून हा दणदणीत, अभूतपूर्व विजय संपादित केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो. या इतिहासाचे शिल्पकार आमचे मतदार सुद्धा आहेत. त्यांचेही आभार आणि अभिनंदन!
लोकसभा निवडणूक जाहीर झाली, तेव्हा पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार नाही, हाच कयास बांधला गेला. त्याला प्रतिवाद म्हणून ‘फिर एक बार मोदी सरकार’, एवढेच नव्हे तर ‘बार बार-मोदी सरकार’ हा नारा जनतेने दिला. जेव्हा चौकीदार म्हणून खिल्ली उडविली गेली, तेव्हा संपूर्ण देश चौकीदार म्हणून मोदीजींच्या पाठिशी उभा राहिला. विरोधकांकडून जाती-पातीचे समीकरण मांडले गेले. पण, देशाने या नकारात्मकतेवर केव्हाच मात केली होती. कसेही करून मोदी सरकार पाडायचेच, या त्वेषाने अनेक नेत्यांना पछाडले होते. पण, देशातील जनतेशी त्यांची नाळ आधीच तुटल्याने, देशाने विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब करण्याचे ठरविले आहे, हेही त्यांना उमगत नव्हते. अखेर या देशातील सुज्ञ मतदारांनीच या स्वार्थी, नकारात्मक, वर्षानुवर्षे भ्रष्टाचाराची साथ देणार्‍यांना, जनतेची फसवणूक करणार्‍यांना, भ्रामक प्रचार करणार्‍यांना, असत्य, अन्यायाची भाषा बोलणार्‍यांना अद्दल घडविली.
पोलपंडितही त्याला अपवाद नव्हते. जाती-पातीचे राजकारण, वेडेवाकडे व्हीडिओ तयार करून खिल्ली उडविण्याचाही प्रयत्न झाला. पण, एक बाब त्यांच्या नजरेत एकतर येत नव्हती अथवा येत असेल तरी ती मुद्दाम दुर्लक्षित केली जात होती, ती म्हणजे या सरकारच्या माध्यमातून लाभ झालेल्या प्रत्यक्ष लाभार्थींची!
स्वच्छ भारत अभियान असो, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा, उज्वला, उजाला अशा कितीतरी योजनांतून जवळजवळ 30 कोटी लोक प्रत्यक्ष लाभान्वित झाले. प्रत्यक्ष लाभ दिल्याने थेट खात्यात पैसे, त्यामुळे मध्यस्थाची यंत्रणा पूर्णत: संपलेली होती आणि हेच परिवर्तन स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर प्रथमच या देशातील जनता अनुभवत होती. आजचा हा घवघवीत जनादेश हा त्याचा परिपाक आहे. एका व्यक्तीने ठरविले तर परिवर्तन घडून येऊ शकते, हे मोदीजींनी या माध्यमातून सिद्ध केले. हा जनादेश या सिद्धतेची सिद्धी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या 31 टक्के मतांची झेप या निवडणुकीत कितीतरी अधिक वाढली, हे यश साधे नाही. भारतीय जनता पार्टीच्या यशात अनेक नेत्यांनी मोठे योगदान दिले. 2 खासदारांचा पक्ष सत्तेपर्यंत आणून बसविला. पण, मला अभिमान आहे, मी त्या पक्षाचा पाईक आहे, ज्याने कधीही सत्ता हे साध्य मानले नाही. ते सेवेचे माध्यम म्हणून स्वीकारले. प्रसंगी विरोधी पक्षात बसावे लागले तरी चालेल. पण, तत्त्वांशी तडजोड कधी केली नाही. सत्तेचा विचार केला तो लोककल्याणासाठीचे साधन म्हणून. 2014 च्या जनादेशाने तर भाजपाला 282 चे निर्विवाद बहुमत दिले होते. पण गेले 5 वर्ष जितक्या गतीने गरिब कल्याण आणि समाजातील सर्व घटकांचा विचार केला गेला, तितका यापूर्वी कधीही झाला नव्हता. बहुमताने गर्वाची नाही तर जबाबदारीची, कर्तव्यतत्परतेची पेरणी झालेली आपण पाहिली. गेल्या 5 वर्षांतील याच बिजारोपणाचे फळ आज आपण पाहतो आहे. म्हणून ‘अब की बार-तीन सौ पार’ शक्य झाले आहे.
आज महाराष्ट्रातील जनादेश सुद्धा जनमानसाचा भाजपावर आणि या नव्या कार्यसंस्कृतीवरील विश्वास अधोरेखित करणारा आहे. मतदारांनी जो भक्कम विश्वास दाखविला, त्याला सार्थ ठरविण्याचे काम येणार्‍या काळात सुद्धा केंद्रातील आणि राज्यातील सरकार करेल, हा विश्वास यानिमित्ताने देतो. आज आपले राज्य दुष्काळाला सुद्धा सामोरे जातेय्. त्यामुळे काही प्रमाणात घालमेल असताना सुद्धा राज्यातील जनतेने जो कौल दिला, तो निश्चितपणे मोलाचा आहे. हेच सरकार या दुष्काळातही आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील, हा विश्वास त्यांच्या मनात आहे, याकडेच या जनादेश निर्देश करतो. त्यांचा हा विश्वास सरकार निश्चितपणे सार्थ ठरवेल.
लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश करणार्‍या सर्व नवोदित खासदारांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. नवभारताच्या निर्मितीतील या प्रवासात प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. पक्ष कोणताही असो, आपले ध्येय एकच असले पाहिजे…
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं, समर्था भवत्वाशिषा ते भृशम्…
॥ भारत माता की जय ॥

देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here