Categories: सामाजिक

लोकमंगलच्या ‘सप्तपदी’ त बांधणार १०७ वधू-वरांच्या रेशीमगाठी

(वेब/टीम)
केवळ सोलापूरच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात ललामभूत ठरलेल्या लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने रविवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता म्हणजेच गोरज मुहूर्तावर लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. लोकमंगलने समता निर्माण केलेल्या या ‘सप्तपदी’च्या मंगलमय उपक्रमात सर्वधर्मीय १०७ वधू-वरांच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार आहेत. हरीभाई देवकरण प्रशालायेच्या प्रांगणात भव्य-दिव्य अशा मंडपात हा सोहळा पार पडणार आहे.
वरुणाला निरोप देताच शिशिराचे आगमन झाल्यानंतर साऱ्यांना उत्सुकता लागून असते, ती या विवाह सोहळ्याची. लोकमंगल फाउंडेशनचे अध्वर्यू तथा राज्याचे सहकार मंत्री सुभाष (बापू) देशमुख यांनी समाजकारणाचा वसा घेतल्यानंतर त्यांची नाळ गरीब, सामान्य व वंचित वर्गाशी जोडली गेली. आर्थिक पाठबळ नसल्याने ऋण काढून सण साजरे करण्याची ती जुनी परंपरा आणि अन्य चालीरीती ह्या त्यांना या वर्गात प्रकर्षाने दिसून आल्या. हे सारे चित्र बदलून टाकण्याचा निर्धार ना. सुभाष बापुंनी केला आणि त्यातून सर्वधर्मातील गरीब व पिडीत वर्गासाठी सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्याची संकल्पना पुढे आली. गेल्या एक तपात या संकल्पनेचे मूळ इतके घट्ट रुजले आहे कि, त्याचा वेलू हळूहळू गननावरी चालला आहे. यंदा या उपक्रमाचे १३ वे वर्ष असून हा सोहळा ३० वा आहे. मा. बापूंनी प्रज्वलित केलेल्या या सामाजिक नंदादीपाची ज्योत सदैव तेवत राहिल. ३ लाख ७५ हजार चौरस फुटावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात सोलापूरच्या पंचक्रोशीतील सामन्यांची असणारी उपस्थिती, वऱ्हाडी मंडळींचे भोजन, सनई चौघड्यांचा मंगलमय दणदणाट आणि वधू-वरांची अगदी हौसेने काढली जाणारी मिरवणूक, सामाजिक प्रश्नांवर केले जाणारे प्रबोधन आणि रक्तदान, नेत्रदान व अवयवदान यावर जागृती हे सारे चित्र पाहता या सोहळ्याला आता लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त होत आहे.
या तपपूर्तीत २ हजार ५९५ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला आहे. यंदाच्याही या सोहळ्यात प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे यासह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य दिले जाणार आहे. वऱ्हाडी मंडळीना सुग्रास भोजन तर आहे, वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले जाणार आहेत. वधू-वरांची शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार असून या सोहळ्याची आठवण म्हणून प्रत्येक जोडप्यांना सीडी दिली जाणार आहे. यंदा समुपदेशनासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधाताई कांकरिया, वक्ते गणेश शिंदे, व रत्नागिरीच्या सामुपादेशिका सुरेखाताई जोशी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर मा. सुभाषबापू व फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.
विवाह समारंभातील दरवर्षीप्रमाणे यंदाचे दालन हे नाविन्यपूर्ण संकल्पनेतून साकारण्यात आले आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या निराधार, जनसामान्य व वंचित घटकांसाठीच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे विशेष दालन उभारण्यात येणार आहे. यामध्ये मनपा अंतर्गत नागरी विकास, कृषी, समाजकल्याण, खादी ग्रामोद्योग, महसूल, शिक्षण महिला बालकल्याण व इतर योजनेची माहिती मिळेल, तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ पत्राचे वाटप करण्यात येईल.
रक्तदान शिबीर-सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून गेल्या सात वर्षांपासून या सोहळ्यात रक्तदान शिबीर भरवले जाते. २०११ साली ३१७,२०१२ ला २८५,२०१४ ला २५० व २०१६ साली २१० असे आतापर्यंत एकूण १ हजार ५८७ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. ह्याही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मदतीचा हात-केवळ विवाह लावून दिला म्हणून जबाबदारी संपत नाही. संसारात भांड्याला भांडे लागत असते. कुठेतरी कुरबुर होत असते. पण त्या भांड्याला लगेच हात लावल्यानंतर नाद थांबतो. प्रपंच करावा नित-नेटका असा संतांचा उपदेश आहे. त्याचा विचार करून या सोहळ्यातील पती-पत्नीचा वाद होवू नयेत म्हणून प्रबोधन केले जाते. झालाच तर तसे वाद मिटवण्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी पुढाकार घेत असतात. त्यामुळे आतापर्यंत या सोहळ्यातील अनेक जोडप्याची ताटातूट होताहोता संसार नेटका झाला आहे. हेही अभिमानाने सांगता येईल. स्त्री भृणहत्या व आत्महत्या रोखण्यासाठी या सोहळ्यातील ज्या जोडप्यांना पहिली कन्यारत्न होईल, त्या मुलीच्या नावे दोन हजार रुपयांची ठेव संयुक्त खात्यावर अठरा वर्षांच्या मुदतीवर ठेवली जाते. आजपर्यंत २२३ मुलींच्या नावे ही ठेव ठेवण्यात आली आहे. या सोहळ्यातील जोडप्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते तसेच व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना कमी व्याजदरात कर्जही मिळवून दिले जाते. एकूणच लोकमंगलचे हे औदार्य पाहता हा सोहळा सामाजिक क्षेत्रात एक मापदंड ठरला आहे.
वरातीचे अप्रूप अन सप्तसुरांची झालर – ह्या सोहळ्याचे सोलापूरकरांना मोठे अप्रूप असते. वधू-वरांचा हा कौतुक सोहळा सोलापूरकरांना ‘याची देही, याची डोळा’ पाहता यावा म्हणून दुपारी तीन ते साडेपाच या वेळेत नव दाम्पत्यांची वरात काढली जाते. त्यामुळे वाहतुकीला कुठलाही अडथळा ठरत नाही, हे एक वैशिष्ट्य यानिमित्ताने सांगता येईल. वरात निघाल्यानंतर वऱ्हाडी लोकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची त्यांना मेजवानी दिली जाते. यंदा भारुड, भजनी व गोंधळी गीतांनी नामवंत कलाकार आपली कला पेश करणार आहेत. लोकमंगलच्या वतीने निराधार माता-पित्यांना अन्नपूर्णा हि योजना राबवली जाते. दररोज शहरातील ४०० लाभार्थ्यांना दोन वेळचे जेवण घरपोच मोफत दिले जाते. त्या सर्वांचा या सोहळ्यात सन्मान केला जातो. त्यांच्यासाठी सन्मान पंगत ठेवली जाते. त्यात हे वृद्ध लोक आनंदाने भोजनाचा आस्वाद घेत असतात.
पुष्पवृष्टीने स्वागत – रविवारी सकाळी वधू-वर यांचे मंडपात आगमन होईल तेव्हा पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात येईल. वरातीचे विवाहस्थळी आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात येईल. त्यासाठी नाशिकचे ढोल पथक यांचेही योगदान असणार आहे.
भव्य व्यासपीठाची सजावट –विवाह सोहळा म्हटल्यानंतर भव्य व्यासपीठ असावे लागते. त्याचा विचार करून ७ हजार स्क्वेअर फुटाचे भव्य व्यासपीठ साकारण्यात आले आहे. त्यावर सोलापूर जिल्ह्याचे श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थांची ५ फुट उंचीची मूर्ती व फुलांच्या डेकोरेशन मधून स्वरांजलीची जोड देत तुतारी, सनई, चौघडे अशा वाद्यांनी सजावट करण्यात येणार आहे.
नम्र आवाहन-कुठलेही कार्य तडीस जाण्यासाठी प्रेरणा आणि सदिच्छा असावी लागते. गेल्या एक तपात सोलापूरकरांच्या पाठींब्यावरच लोकमंगलचा हा जगन्नाथाचा रथ पुढे जात आहे. शहरवासीयांकडून मिळत असलेल्या भरभक्कम पाठबळामुळे आम्हाला या सोहळ्यात कुठलीही कमतरता आतापर्यंत भासलेली नाही व यापुढेही भासणार नाही. तेव्हा सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद द्यावेत असे नम्र आवाहन आम्ही करत आहोत.
लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात श्री श्री श्री १००८ श्रीशैल जगदगुरू डॉ. चनसिद्ध पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्यसानिध्य १०७ रेशीमगाठी बांधल्या जाणार आहेत. या जोडप्यांना आनंदमय वैवाहिक आयुष्याचे शुभाशिर्वाद देण्यासाठी समस्त सोलापूरकरांनी उपस्थित राहावे. यासाठी आग्रहाचे निमंत्रण देत आहोत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

1 hour ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

4 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

8 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

23 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

24 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago